सोलापूर : शहर आणि जिल्ह्यात कोरोनाचे संकट अधिक गडद होऊ लागले आहे. आजवर 81 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले असून सुमारे एक हजार लोक कोरं टाईन मध्ये आहेत. एकीकडं आपत्ती व्यवस्थापन कायद्याची अंमलबजावणी सुरू असताना हजारो कर्मचारी असलेल्या महापालिका, जिल्हा परिषद मधील मोजकेच कर्मचारी कोरोना साठी कार्यरत असल्याचे दिसते. केंद्र आणि राज्य सरकारच्या सर्व कर्मचाऱ्यांना आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार कामाला लावण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना आहेत मात्र लाखो रुपये पगार घेणारे अधिकारी निवांत घरी बसले असून अत्यल्प पगार असणारे अंगणवाडी मदतनीस सेविका तसेच आशा वर्कर आणि शिक्षक हे दारोदारी फिरून सर्वेक्षणाचे काम करतात. केरळ सरकारने कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये पुढील पाच महिने 25 टक्के कपात केली आहे त्याच धर्तीवर ज्या कर्मचाऱ्यांनी गेली महिनाभर सेवा केली नाही त्यांच्या पगारामध्ये देखील कपात करावी आणि जे कोरोनासाठी काम करत आहेत त्यांना पगार वाढवून द्यावा अशी मागणी सोशल मीडियातून होत आहे. युद्धजन्य परिस्थिती सारखीच कोरोनाची परिस्थिती असल्यामुळे जिल्हाधिकार्यांनी सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना कामाला लावणे तसेच खाजगी डॉक्टरांची सेवा वर्ग करून घेणे गरजेचे आहे. त्यांना योग्य ते साहित्यदेखील देणे तेवढेच महत्त्वाचे आहे.