सातारा : राज्यातील सत्ताधारी महायुतीमध्ये छोट्या घटक पक्षांची घुसमट होत असतानाच राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांनी भाजप विरोधात उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. ते गेल्या काही दिवसांपासून महायुतीवर नाराज असल्याची चर्चा सुरू असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी महादेव जानकर यांना थेट साद घालत त्यांच्या कोट्यातील माढा लोकसभेची जागा सोडण्याची तयारी दर्शवली आहे.
त्यामुळे महादेव जानकर कोणता निर्णय घेणार? अशी चर्चा रंगली आहे. दरम्यान, महादेव जानकर यांनी शरद पवार यांनी माढा लोकसभेची जागा सोडण्याची तयारी दर्शवल्यानंतर स्वागत केलं होतं. मात्र, त्यांनी शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस आम्हाला कोणती जागा सोडणार? अशी विचारणा केली होती.
अभयसिंह जगतात राष्ट्रवादीकडून इच्छूक
दरम्यान महादेव जानकरांसाठी शरद पवार आग्रही असतानाच शरद पवार गटातून अभयसिंह जगताप हे सुद्धा माढा लोकसभेसाठी इच्छुक आहेत. जगताप यांनी आज शरद पवार यांची भेट घेत माढा लोकसभा मतदारसंघासाठी इच्छुक असल्याचे म्हटलं आहे. दरम्यान, शरद पवार यांनी महादेव जानकर यांना घातलेली साद माहीत असली, तरी जानकर महाविकास आघाडीकडून उभारण्यास इच्छुक नसतील, तर माझ्या उमेदवारीचा विचार व्हावा असे मी शरद पवारांना सांगितल्याचे जगताप यांनी म्हटले आहे. माढा लोकसभा मतदारसंघातील सर्व विधानसभा मतदारसंघांमध्ये मी फिरलो असून याची माहिती शरद पवारांना दिली. पदाधिकारी सोबत असून आम्ही चर्चा केली आहे. त्यामुळे योग्य तो निर्णय शरद पवार घेतील असं त्यांनी म्हटले आहे.