सोलापूर विद्यापीठात शिवजयंतीनिमित्त विशेष व्याख्यान
सोलापूर- छत्रपती शिवाजी महाराज यांचे आचार, विचार आचरणात आणून युवकांनी राष्ट्राच्या प्रगतीसाठी काम करावे, असे आवाहन यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिकचे प्र-कुलगुरू प्रा. जोगेंद्रसिंह बिसेन यांनी केले.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या एनएसएस विभागाकडून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित व्याख्यानात प्रा. बिसेन हे बोलत होते. ‘जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज’ हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्र कुलगुरू प्रा. लक्ष्मीकांत दामा हे होते. यावेळी कुलसचिव योगिनी घारे, राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्रा. देवानंद चिलवंत, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. राजेंद्र वडजे, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. केदारनाथ काळवणे यांची उपस्थिती होती.
प्रा. बिसेन म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचे नसून अखिल भारताचे प्रेरणास्त्रोत आहेत. अनाचार अत्याचाराला मूठमाती देऊन त्यांनी परस्त्रीला मातेसमान मानून स्त्रियांचा सन्मान केला. राष्ट्रासाठी त्यांनी चांगली शिकवण घालून दिली आहे. भारताच्या उज्वल्य भविष्यासाठी शिवचरित्राचे पारायणे घालण्याची गरज असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. यावेळी प्र कुलगुरू प्रा. लक्ष्मीकांत दामा यांनीही स्वराज्यासाठी, सुशासनासाठी युवकांनी शिवाजी महाराज यांचे आचार विचार आचरणात आणून त्या दृष्टीने काम केले पाहिजे, असे आवाहन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. तेजस्विनी कांबळे यांनी केले.