आळंदी येथे गीताभक्ति अमृत महोत्सवाचा सोहळा सध्या सुरु आहे.अतिशय मंगलमय वातावरणांत हा सारा सोहळा संपन्न होत आहे. विविध मान्यवर,संत,महात्मे या सोहळ्यास आपली उपस्थिती दर्शवित आहेत. या सोहळ्यात महा एनजीओ फेडरेशनसाठी आजचा दिवस म्हणजे दूग्धशर्करा योग होता. विविध क्षेत्रात काम करणाऱ्या सुमारे २५०० सामाजिक संस्थांच्या कार्याचा परिचय असलेले महा एनजीओ फेडरेशन द्वारे प्रकाशित “नाते समाजाशी” या पुस्तकाचे प्रकाशन आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रणेते श्री श्री रविशंकर गुरुदेवजी, श्रीराम जन्मभूमी ट्रस्ट अयोध्या चे कोषाध्यक्ष स्वामी श्री गोविंद देव गिरिजी महाराज, पूज्य साध्वी ऋतंबरा दीदीमाँ, वृंदावन चे पूज्य संजीव कृष्ण ठाकूर महाराजजी, बिर्ला ग्रुप चे राजश्रीजी बिडला, पूज्य चिन्नजिअर स्वामीजी, पूज्य श्री सुधांशु महाराजजी, वन मंत्री सुधीरजी मुनगंटीवार, आमदार महेशजी लांडगे, राजेश मालपाणी या सर्वांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.
महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे अध्यक्ष व महा एनजीओ फेडरेशनचे संस्थापक शेखर मुंदडा म्हणले कि, १०१ सामाजिक संस्थांपासून सुरु झालेले फेडेरेशन आज २५०० सामाजिक संस्थांपर्यंत पोहचल्याने आम्ही खूप आनंदित आहोत. लहान सामाजिक संस्थांना एकत्र आणून त्यांना त्यांच्या पायावर उभे करून सर्व सुविधांसह सक्षम करणे हे आमचे मुख्य कार्य आहे. अध्यात्मिक क्षेत्रातील माझे दोन्ही गुरु व महान संतांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन झाल्यामुळे अजून जोमाने कार्य करण्यासाठी ऊर्जा मिळाली आहे. महा एनजीओ फेडरेशनसाठी हा क्षण अतिशय भाग्याचा आणि अविस्मरणीय असा आहे.
महा एनजीओ फेडरेशनचे संचालक अमोल उंबरजे म्हणाले कि, शेखर मुंदडा याच्या संकल्पनेतून व महा एनजीओ फेडेरेशन प्रकाशित समाजासाठी तळमळीने काम करणाऱ्या व राष्ट्र हितासाठी आपले योगदान देणाऱ्या २५०० सामाजिक संस्थांची माहिती नाते समाजाशी ह्या पुस्तकात दिले आहे. सामाजिक संस्थांचे कार्यपरिचय असलेले हे पुस्तक दानशूर संस्था आणि गरजू संस्था यांना जोडण्यासाठी अत्यंत महत्वपूर्व ठरेल आणि ह्यातून अनेक सामाजिक कार्य सफल होतील. येणाऱ्या काळात अजून अधिक प्रमाणात सामाजिक संस्थांना एकत्र आणून संघटन करण्याच्या दिशेने प्रयत्न करत आहोत. महा एनजीओ फेडरेशनचे सोलापूर शहर व जिल्हा मध्ये मोठ्या प्रमाणात विविध विषयांवर सामाजिक कार्य चालू आहे.
याप्रसंगी ज्येष्ठ संचालक मुकुंद अण्णा शिंदे, संचालक अमोल उंबरजे, गणेश बाकले, योगेश बजाज, राहुल जगताप, शशांक ओंभासे, अपूर्वा करवा यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.