मुंबईः राज्यसभेच्या रिक्त होत असलेल्या जागांसाठी येत्या २७ फेब्रुवारी रोजी निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. महाराष्ट्रातील एकूण ६ खासदारांचा कार्यकाळ २ एप्रिलला संपणार आहे. यात प्रकाश जावडेकर, नारायण राणे, कुमार केतकर, अनिल देसाई, व्ही. मुरलीधरन, वंदना चव्हाण यांचा समावेश आहे.
महाराष्ट्र भाजपच्या कोट्यातील जागांसाठी पक्षाकडून एक यादी केंद्रीय नेतृत्वाकडे पाठवण्यात आलेली आहे. भाजपने दिल्लीला पाठवलेल्या यादीमध्ये नारायण राणे, विनोद तावडे, पंकजा मुंडे, विजया रहाटकर, संजय उपाध्याय, अमरिश पटेल, माधव भंडारी, चित्रा वाघ यांचा समावेश आहे. यापैकी किती जणांच्या गळ्यात राज्यसभेची खासदारकी पडते, हे पाहाणं महत्त्वाचं आहे.
दुसरीकेडे भाजपच्या राष्ट्रीय नेत्या पंकजा मुंडे यांनी ६ फेब्रुवारी रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सागर बंगल्यावर भेट घेतल्याचं पुढे आलं होतं. पंकजा मुंडे यांना भाजप राज्यसभेवर संधी देणार का? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला होता.
पंकजा मुंडेंच्या प्रश्नावर उत्तर देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राज्यसभेवर कोण जाईल आणि कोण जाणार नाही याचा निर्णय दिल्लीतील वरिष्ठ नेते घेणार आहेत. पंकजा मुंडे ह्या आमच्या राष्ट्रीय मंत्री आहेत. त्यांना राज्यसभेवर संधी मिळेल की लोकसभेत, किंवा पक्षात कुठलं पद मिळेल, याचा निर्णय केंद्रामध्ये होणार आहे. जो निर्णय होईल तो चांगलाच होईल असंही फडणवीस म्हणाले.