नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर प्रतिक्रिया देताना मोदी सरकार २ च्या कार्यकाळातील शेवटचे संसदीय भाषण केले. आपल्या भाषणात मोदींनी काँग्रेसवर जोरदार टीका करताना तिसऱ्यांदा मोदी सरकारच सत्तेवर येणार असल्याचेही म्हटले. आता आमच्या सरकारचा तिसरा कार्यकाळ दूर नाही. जास्तीत जास्त १०० ते १२५ दिवस राहिले आहेत. केवळ काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे नाही, तर संपूर्ण देश सांगत आहे की, ‘अब की बार ४०० पार’. शक्यतो या आकड्यांच्या खेळात जात नाही. मात्र, देशाचे मत आणि सूर समजू लागला आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीला ४०० पेक्षा जास्त जागा मिळतीलच, मात्र भारतीय जनता पार्टीला ३७० जागांवर विजयी करतील, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. मोदींच्या या दाव्यावर आता काँग्रेसने प्रश्न उपस्थित केला आहे.
नरेंद्र मोदी यांनी भाषणाच्या सुरुवातीपासूनच काँग्रेसवर सडकून टीका केली. पुढे बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, आमच्या सरकारचा तिसरा कार्यकाळ खूप मोठ्या निर्णयांचा ठरणार आहे. लाल किल्यावरून भाषण करताना सांगितले होते. तसेच राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यातही त्याबाबतचा पुनरुच्चार केला होता. पुढील एक हजार वर्षांपर्यंत देशाला समृद्ध आणि सिद्धीच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचलेले पाहायचे आहे. तिसऱ्या कार्यकाळात पुढील हजार वर्षांच्या देशाच्या वाटचालीसाठी एक मजूबत पाया तयार केला जाईल. देशातील १४० कोटी जनतेच्या क्षमतेवर माझा खूप मोठा विश्वास आहे. त्यामुळे, भाजपला ३७० आणि एनडीएला ४०० पेक्षा जास्त जागा जिंकता येतील, असे पंतप्रधान मोदींनी म्हटले. मोदींच्या या विधानावर आक्षेप घेत लोकसभेतील विरोधी पक्षनेते अधीर रंजन चौधरी यांनी सवाल उपस्थित केला आहे. निवडणुकांपूर्वीच मोदींना हे कसं समजलं?, असे चौधरी यांनी म्हटले.