सोलापूर :- जिल्ह्यात स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियान 2024 अंतर्गत 30 जानेवारी 2024 ते 13 फेब्रुवारी 2024 या कालावधीत सर्वसामान्य नागरिकांमध्ये कुष्ठरोग विषयक जनजागृती करण्यात येत आहे. कुष्ठरोग हा निदान करण्यास सोपा असून, औषध उपचाराने पूर्णत: बरा होणारा आजार आहे. कुष्ठरोगी रुग्ण शोधण्यासाठी जिल्ह्यातील शासकीय व सामाजिक बांधिलकी असलेल्या सर्व यंत्रणांनी मदत करावी. तसेच नागरिकांनी कुष्ठरुग्ण असलेल्या व्यक्तीसोबत कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम, राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम व राष्ट्रीय किशोर स्वास्थ्य कार्यक्रमातर्गंत आढावा बैठकीत जिल्हाधिकारी आशीर्वाद बोलत होते. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुहास माने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले, वैद्यकीय अधिकारी डॉ.अग्रजा चिटणीस, आरोग्यसेवा कुष्ठरोग सहाय्यक संचालक एम.के. शेगर, डॉ. मीनाक्षी बनसोडे यांच्यासह अन्य आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी आशीर्वाद म्हणाले की स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियानांतर्गत सर्व शासकीय यंत्रणा व सामाजिक बांधिलकी असणाऱ्या संस्थांनी सोलापूर जिल्हा कुष्ठरोग मुक्त होण्यासाठी प्रयत्न करावेत. याविषयी समाजाचे प्रबोधन करावे. तसेच या रुग्णाविषयी कोणीही भेदभाव करू नये. प्रत्येक नागरिकांनी अशा रुग्णाविषयी सामाजिक बांधिलकी ठेवून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अथक प्रयत्न करावेत असे त्यांनी सूचित केले.
राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमातर्गंत तंबाखू सेवनाच्या हानिकारक परिणामाबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रयत्न करावेत. जिल्हास्तरीय अंमलबजावणी पथकामार्फत सोलापूर शहर व ग्रामीण भागात कोटपा कायदा 2003 ची प्रभावी अंमलबजावणी करावी. शाळा, महाविद्यालय स्तरावर जनजागृती करावी. तंबाखू सोडवण्यासाठी समुपदेशन करावे. या अंतर्गत विविध शासकीय व निमशासकीय कार्यालयांमध्ये ही मौखिक आरोग्य तपासणी करावी असे निर्देश जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी दिले. तसेच राष्ट्रीय किशोर स्वास्थ्य कार्यक्रमाची ही जिल्ह्यात प्रभावीपणे अंमलबजावणी करावी. या अंतर्गत 10 ते 19 वयोगटातील किशोर अवस्थेतील मुला मुलींवर अधिक लक्ष केंद्रित करावे. एचआयव्ही एड्स बाधितांसाठी असलेल्या संजय गांधी निराधार योजना व बाल संगोपन योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी असेही त्यांनी निर्देशित केले.
डॉ. शेगर यांनी राष्ट्रीय पुस्तक निर्माण कार्यक्रमातर्गंत 30 जानेवारी ते 13 फेब्रुवारी 2024 या पंधरवड्यात स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियान 2024 जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्यात येणार असल्याची माहिती दिली. यावर्षीचे घोषवाक्य "कलंक कुष्ठरोगाचा मिठवू या, सन्मानाने स्वीकार करूया" हे घोषवाक्य असल्याचे त्यांनी सांगितले. सन 2023 मध्ये जिल्ह्याच्या ग्रामीण व शहरी भागातील 36 लाख 57 हजार लोकसंख्येची तपासणी केली असता संशयित कुष्ठरोग 13 हजार 282 इतके निघाले तर त्यापैकी 129 नवीन कुष्ठरोग बाधित रुग्ण आढळून आल्याचे त्यांनी सांगितले.
डॉ. बनसोडे यांनी जिल्ह्यात राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत 758 शाळा तंबाखूमुक्त शाळा म्हणून घोषित करण्यात आल्याची माहिती दिली. तसेच तंबाखू मुक्ती केंद्र मार्फत 22 हजार 659 रुग्णांना तंबाखू व्यसनमुक्तीवर समुपदेशन केल्याचे सांगितले. तसेच कोटपा कायदा 2003 अंतर्गत जवळपास 77 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. माने व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नवले यांनीही अनुषंगिक माहिती बैठकीत दिली.