मुंबई : लॉकडाउन कालावधी संपणार की, वाढणार याची शाश्वती नसतानाही ऑनलाइन तिकीट बुकिंगद्वारे ग्राहकांना लुबाडणाऱ्या विमानसेवा कंपन्यांना डीजीसीएने चपराक दिली आहे. तिकिटाची संपूर्ण रक्कम परत करा, असे निर्देश त्यांनी कंपन्यांना दिले आहेत.
२१ दिवसांचा लॉकडाउन १४ एप्रिलला संपणार होता. तो वाढणार नाही, याची कुठलीही शाश्वती नसताना कंपन्यांनी १५ एप्रिलपासून तिकिटाचे ऑनलाइन बुकिंग सुरू केले होते. तत्काळ प्रवासाची निकड असलेल्या हजारो प्रवाशांनी यामुळे आगाऊ बुकिंग करून ठेवले. पण आता ३ मेपर्यंत लॉकडाउन वाढविण्यात आल्याने सर्व विमानोड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. त्यामुळे या काळातील तिकिटे आपोआप रद्द झाली आहेत. परंतु, विमान कंपन्या प्रवाशांना तिकिटाचे पैसे परत करण्यास तयार नाहीत. त्याऐवजी याच तिकिटावर अन्य दिवशी प्रवास करा, पण तिकीट रद्द होणार नाही, अशी भूमिका कंपन्यांनी घेतली. यात प्रवाशांना आर्थिक भूर्दंड सोसावा लागत असल्याचे वृत्त ‘मटा’ने दिले. त्यानंतर गुरुवारी निघालेल्या नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाच्या (डीजीसीए) परिपत्रकामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.
डीजीसीएच्या परिपत्रकानुसार, पहिल्या लॉकडाउन कालावधीतील (२५ मार्च ते १४ एप्रिल) प्रवासासाठी ज्या प्रवाशांनी देशांतर्गत किंवा आंतरराष्ट्रीय तिकीट बूक केले होते, त्यांना तिकिटाची पूर्ण रक्कम परत द्या. त्याचवेळी लॉकडाउन कालावधित १५ एप्रिल ते ३ मेदरम्यानच्या प्रवासासाठी ज्यांनी अशाच दोन्ही सेवेचे तिकीट काढले असेल, त्या सर्व प्रवाशांना तिकिटाची पूर्ण रक्कम परत करा, असे स्पष्ट निर्देश डीजीसीएने परिपत्रकाद्वारे दिले आहेत.
दरम्यान, विमान कंपन्या अशाप्रकारे तिकिटाची रक्कम परत करीत नसल्याबद्दल प्रवाशांमध्येही संताप होता. चेतन पेडणकर या मुंबईच्या प्रवाशांने केंद्र सरकारकडे याबाबत ऑनलाइन तक्रारही केली होती. अशा अनेक तक्रारी केंद्राकडे आल्या होत्या. त्यानंतर हा महत्त्वाचा निर्णय झाला आहे.