सोलापूर,(प्रतिनिधी):- शिंदे साहेब तुम्हाला नाट्यसंमेलन आयोजनाचा मोठा अनुभव आहे सोलापूरमध्ये होत असलेल्या 100 व्या विभागीय नाट्यसंमेलनाचे आपण प्रमुख पाहुणे म्हणून यावे विनंती करीत पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी माजी केंद्रीयमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना जनवात्सल्य येथे जावून आग्रहपूर्वक निमंत्रण दिले. त्यांच्या समवेत नाट्यसंमेलनाचे कार्याध्यक्ष प्रकाश यलगुलवार, प्रमुख कार्यवाह विजय साळुंखे, माजी मंत्री सिध्दाराम म्हेत्रे, समन्वयक मोहन डांगरे, कृष्णा हिरेमठ, प्रशांत बडवे, अविनाश महागांवकर यांच्यासह समिती सदस्य उपस्थित होते.
साहेब नाट्यसंमेलनाला या
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मुंबई यांचे शतक महोत्सवी विभागीय मराठी नाट्य संमेलन सोलापूर मध्ये दि. 20 ते 28 जानेवारी 2024 या दरम्यान होणार आहे. सोलापूर, पंढरपूर, मंगळवेढा,सांगोला, अकलूज आणि बार्शी या नाट्य परिषदेच्या शाखांकडून या नाट्य संमेलनाचे आयोजन करण्यात येत आहे. या नाट्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील असून मुख्य निमंत्रक उद्योगमंत्री उदय सामंत हे आहेत. सोलापूरमध्ये होत असलेल्या 100 व्या विभागीय नाट्यसंमेलन मोठ्या उत्साहात आणि सर्वांना सामावून घेवून करण्यात येणार आहे.
त्याचाच भाग म्हणून सोलापूरमध्ये यापुर्वी 88 वे मराठी नाट्य संमेलन यशस्वीपणे आयोजित करण्यात सुशीलकुमार शिंदे यांचा मोठा सहभाग होता त्यामुळेच यंदाच्या या 100 व्या नाट्यसंमेलनात त्यांनी सहभाग घ्यावा आणि नाट्यसंमेलनाला त्यांनी प्रमुख पाहुणे म्हणून यावे यासाठीच स्वागताध्यक्ष तथा पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या सातरस्ता येथील जनवात्सल्य या निवासस्थानी जावून त्यांना निमंत्रण दिले. त्यांच्याशी चर्चा करून नाट्यसंमेलन यशस्वी करण्यासाठी योगदान देण्याची विनंती ही यावेळी करण्यात आली. त्यावर सुशीलकुमार शिंदे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे आणि नाट्यसंमेलनाला येण्याचे त्यांनी मान्य केल्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी सांगितले.