सोलापूर : प्रिसिजन उद्योगसमूहाकडून मार्कंडेय सहकारी रुग्णालयाला व्हेंटिलेटर भेट देण्यात आला आहे. कोरोनामुळे निर्माण झालेल्या आणीबाणीसारख्या परिस्थितीत ‘प्रिसिजन’ने निर्माण केलेली व्हेंटिलेटरची सुविधा महत्वपूर्ण ठरणार आहे.
‘सोलापूरच्या पूर्व भागाची आरोग्यवाहिनी’ अशी मार्कंडेय सहकारी रुग्णालयाची ओळख आह. या भागात कष्टकरी समाज मोठ्या प्रमाणावर आहे. त्यांना या आरोग्यसेवेचा लाभ मिळतो आहे. मार्कंडेय रुग्णालयाच्या व्यवस्थापनाकडून रुग्णालयाच्या विविध विभागांचे आधुनिकीकरण केले जात आहे. याचाच एक भाग म्हणून प्रिसिजनने आपल्या सीएसआर फंडातून हा व्हेंटिलेटर दिला आहे. मॅकवेट कंपनीचे ‘सर्व्हो-एस’ हे अत्याधुनिक तंत्रज्ञान असणारा हा व्हेंटिलेटर रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात (ICU) बसविण्यात आला आहे. या मदतीबद्दल रुग्णालयाच्या वतीने डॉ. माणिक गुर्रम, डॉ. विजयकुमार अरकाल, श्रीनिवास गोसकी, डॉ. राजशेखर स्वामी, मेडिकल ऑफिसर डॉ. सुरेश मणुरे आदींनी प्रिसिजन कॅमशाफ्ट्स लिमिटेडचे चेअरमन मा. यतिन शहा व प्रिसिजन फाऊंडेशनच्या अध्यक्षा डॉ. सुहासिनी शहा यांचे आभार मानले.