येस न्युज मराठी नेटवर्क : (अशोक ढोबळे) खरंतर लग्नपश्चात प्रपंचामध्ये स्थिरस्थावर झाल्यानंतर काही वर्षांनी मनाला थोडीशी उसंत मिळते आणि मन पुन्हा भूतकाळात रेंगाळायला लागते…बालपणीचे मित्र- मैत्रिणी,शाळेमध्ये केलेल्या दंगामस्ती, अभ्यास,अभ्यास व शिस्तीसाठी शिक्षकांचा खाल्लेला मार,गॅदरिंग,संस्मरणीय सहली,क्रीडा स्पर्धा,परीक्षेला सामोरे जाताना पोटात होणारी बाकबूक, परीक्षेचा ‘निकाल’ या सर्व गोष्टी मनपटलावरून एका मागे एक सरकू लागतात…आणि मग सुरू होतो शोध एकमेकांच्या मोबाईल नंबरचा, मोबाईल नंबर शोधले जातात आणि या मित्रांचा मैत्रिणींचा तयार होतो ‘व्हाट्सअप ग्रुप’ आणि मग ग्रुपवर सुरू होते चर्चा ‘गेट टू गेदर’ची…प्रत्येक जण आपल्या व्यापामध्ये व्यस्त असल्याने तारखेबाबत मग एकमत होत नाही आणि मग हो-नको म्हणत एकदाची तारीख ठरतेच..त्या दिवशी ‘मला जमणार नाही’,’अमूक तारीख घ्या’, ‘यात्रेच्या वेळेस घ्या’,असे रिप्लाय मिळायला लागतात; पण आपल्यातलेच काही आता तारीख ठरली ‘गेट टू गेदर’ होणारच असा निर्धार सुनावू लागतात….आणि मग स्नेहमेळाव्याचा दिवस उजाडतो आणि ‘येणार नाही’, ‘जमणार नाही’ असे म्हणणारे सर्वात अगोदर उपस्थित असतात..आणि मग सुरुवात होते जुन्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा मिळायला…निमित्त होते श्री संगनबसवेश्वर शिवयोगी कन्या प्रशाला आणि श्री उमा विद्यालय मोडनिंबच्या सन 1998- 99 च्या इयत्ता दहावीच्या बॅचच्या विद्यार्थी- विद्यार्थिनींच्या स्नेह मेळाव्याचे..!
तारीख 25 डिसेंबर 2023 …तब्बल दोन तपानंतर शालेय जीवनातील मित्र-मैत्रिणी श्री उमा विद्यालय मोडनिंबच्या प्रांगणात स्नेहमेळाव्याच्या निमित्ताने एकत्रित आले होते.
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः।
गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः ।।
ज्यांच्याकडून ज्ञानाचे व शिस्तीचे धडे घेतले अशा आपल्या आदरणीय गुरुजनांचे…दुतर्फा उभे राहत…पुष्पवर्षाव करत…सुहास्य वदनाने… टाळ्यांच्या निनादामध्ये सर्व माजी विद्यार्थी- विद्यार्थीनींनी सहर्ष स्वागत केले गेले.
मान्यवरांच्या हस्ते सरस्वती आणि उमाबाईसाहेब पटवर्धन यांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीप प्रज्वलन करण्यात आले… उपस्थित सर्व शिक्षकांचे आणि विद्यार्थ्यांचे संगनबसवेश्वर कन्या प्रशालेच्या विद्यार्थिनींच्या वतीने गुलाबाचे फुल आणि पेढा देऊन स्वागत करण्यात आले.
‘तमसो मा ज्योतिर्गमय’
…. या संस्कृत सुभाषिताची आठवण करून देत होते…कु. हर्षाली सुरवसे हिने नेत्रदीपक अशा नृत्य आराधनेतून सरस्वती वंदना करत उपस्थितांची मने जिंकली…
ज्यांनी वृक्षारोपणाचा संस्कार केला त्यांच्या स्वागतासाठी देऊ केलेली छोटी रोपे…शिष्य त्यांच्यावर झालेले गुरुजनांचे संस्कार विसरले नाहीत हेच सांगत होती….प्रौढ वयामध्ये बाल’ व्हायला आलेले सर्वच भूतकाळातील किश्श्यांमध्ये, आठवणींमध्ये रममाण झाले होते…
आर एस पाटील सर,म्हमाणे सर,चोपडे सर,परबत सर,मुलाणी सर,वागज मॅडम,बनसोडे सर…
श्रीमंत सौ उमाबाई पटवर्धन स्मारक संस्थेचे अध्यक्ष व्ही के पाटील,शेळके सर,पाटोळे सर, यांनी अनेक जुन्या आठवणींना उजाळा दिला.
आयुष्याला कसे सामोरे जावे याचा मूलमंत्र सर्वांना दिला.यावेळी अनेकांना अश्रू अनावर झाले…त्यानंतर कहाणीमध्ये ट्विस्ट आणला तो म्हणजे…आपल्या चिर परिचित विनोदी शैलीसाठी लक्षात असलेले अरविंद भड सर यांनी…अनेक मिश्किल, खुमासदार किस्से सांगत भड सरांनी स्नेह मेळाव्यामध्ये हास्यकल्लोळ उडवून देत विद्यार्थ्यांचा ‘क्लास’ घेतला
बी जी पाटील सर, खडके सर यांनीही उपस्थिती लावली..या मेळाव्यासाठी शिक्षक तर उपस्थित होतेच पण शिक्षकेतर कर्मचारी कांबळे भाऊसाहेब, पवार काका, पंडित काका, चाचा आदीसुद्धा स्नेह मेळाव्यासाठी आनंदाने उपस्थित होते…
सीमा दोभाडा आणि अस्मिता देशपांडे या दोघींनी आपल्या मनोगतामध्ये शालेय जीवनातील अनेक आठवणी जागविल्या…स्नेहमेळाव्याच्या निमित्ताने दरवर्षी सर्वांनी भेटायचंच असा मूकसंदेश देणारा संकल्प केक’ पाटील मॅडम आणि वागज-सुर्वे मॅडम यांच्या हस्ते कापण्यात आला…
स्नेहमेळाव्यांच्या निमित्ताने आजच्या स्मृती कायम लक्षात ठेवण्यासाठी ‘फोटोसेशन’ च्या माध्यमातून धडपड सुरू झाली…फोटोसेशनची जबाबदारी गणेश, रामदास,अमोल या मित्रांनी स्वयंस्फूर्तीने उचलली.
स्नेहमेळाव्याच्या दुसऱ्या सत्रात सर्वांच्या गाड्या वळाल्या त्या म्हणजे हॉटेल कल्पतरूच्या दिशेने…सर्व गुरुजनांसाठी गुलाब पाकळ्यांनी जेवणाचे मेज सजवण्यात आले होते…मंद आवाजात सुरू असलेले संगीत ‘माहौल’ आणखी प्रसन्न बनवत होते…सर्व मित्र मैत्रिणी जेवणाच्या ताटाची वाट पहात गप्पांमध्ये दंग झाले होते…पोटामध्ये भुकेने कावळे ओरडत होते पण 24 वर्षांपासूनची गप्पांची ‘भूक’ वरचढ होत होती…तेवढ्यात एक ‘अनपेक्षित’ घोषणा झाली ती म्हणजे माजी विद्यार्थी व वेब सिरीजचे निर्माते/अभिनेते गणेश हागे सर यांच्या नृत्यसादरीकरणाची…आपल्या अदाकारीने व नृत्याविष्काराने सर्वांना मोबाईल कॅमेरा हातात धरायला व पर्समध्ये/ खिशांमध्ये हात घालायला भाग पाडले…खूप धमाल आली…सर्वांसाठी जेवणाची ताटं आली…आणि सर्वांनी गप्पा तोंडी लावत जेवणावर यथेच्छ ताव मारला…
माजी विद्यार्थ्यांच्या आदरातिथ्याने आनंदित झालेले अर्जुन बनसोडे सर यांनी उत्कृष्ट नियोजनासाठी संयोजन समितीचे विशेष कौतुक केले…शेवटी दरवर्षी स्नेहमेळाव्याला भेटण्याचे आवाहन करण्यात आले. आभार मानल्यानंतर देखील सर्वजण गप्पा मारत फोटोसेशन करत तिथेच रेंगाळत होते… तिथून जाण्यासाठी कोणाचाही पाय निघत नव्हता… पुन्हा स्नेहमेळाव्यात भेटण्याचा वायदा करत सर्वांनी जड अंतकरणांनी एकमेकांचा निरोप घेतला…
‘अशी पाखरे येती आणिक स्मृती ठेवूनी जाती,
दोन दिसांची रंगत संगत दोन दिसांची नाती’
गीता गडेकर,अस्मिता देशपांडे,पद्मजा शिंदे,उज्ज्वला पाटील,संयोगिता गायकवाड यांनी व सर्व मैत्रिणींनी मिळून जिल्हा परिषद मुलींच्या शाळेस शाळेच्या गरजेनुरूप दोन गॅसच्या शेगड्या भेट देऊन शाळेविषयी असणारी कृतज्ञता व्यक्त केली…स्नेह मेळावा यशस्वी होण्यासाठी नियोजन समितीचे सदस्य पद्मजा शिंदे,गीता गडेकर,उज्वला पाटील,अस्मिता देशपांडे,गणेश शिंदे,सुमीत बोधे,प्रशांत गिड्डे,अमोल बिनगे,चंद्रकांत माने,रामदास साळुंके,दादा सुरवसे व सर्व मित्र-मैत्रिणी यांनी विशेष परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोक ढोबळे,अस्मिता देशपांडे,सीमा दोभाडा, सुवर्णा व्यवहारे यांनी केले तर आभार पद्मजा शिंदे यांनी मानले.
मोडनिंब मध्ये दोन्ही शाळांच्या संयुक्त विद्यमाने घेतलेल्या आणि यशस्वी झालेल्या या माजी विद्यार्थी- शिक्षक स्नेह मेळाव्याचे सर्व स्तरातूनकौतुक होत आहे.