प्रतिनिधी- सोलापुरात होणाऱ्या राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचे थाटात भूमिपूजन झाले असून सोन्या नावाचा सर्वात उंच वळू यंदाच्या कृषी प्रदर्शनात सर्वांचे आकर्षण ठरणार असल्याचे सांगण्यात आले.
श्री सिद्धेश्वर देवस्थान संचलित राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचे होम मैदान इथे थाटात भूमिपूजन संपन्न करण्यात आले. यावेळी श्री सिद्धेश्वर देवस्थान पंचकमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी,कृषी प्रदर्शनाचे चेअरमन गुरुराज माळगे यांच्या हस्ते कृषी प्रदर्शनाचे भूमिपूजन करून सभा मंडपाचे पूजन करत हातोडा मारण्यात आला. यावेळी श्रीसिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीचे सर्व विश्वस्त पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते.
कृषी प्रदर्शनाचे यंदाचे हे 53 वे वर्ष असून गेल्या वर्षी शेतकऱ्यांनी या प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रसाद दिलेला दिसून आला. तीनशेहून अधिक स्टॉल्स या प्रदर्शनामध्ये असणार आहेत तसेच प्रदर्शनाचे वैशिष्ट्य म्हणजे भारतातील सर्वात उंच सोन्या हा वळू यामध्ये देखील सहभागी होणार आहे. तसेच डॉग आणि कॅट शो देखील संपन्न होणार आहे. श्वान तसेच वन्यजीव प्रेमींनी यात सहभाग नोंदवावा असे आवाहन करण्यात आले.
कृषी क्षेत्रातील नामवंत कंपन्या तसेच सोलापूर जिल्हा कृषी विभागाच्या सहकार्याने हे प्रदर्शन संपन्न होणार आहे. भव्य दिव्य अशा या कृषी प्रदर्शनाचा लाभ शेतकऱ्यांसह विविध कंपन्यांनी आणि नागरिकांनी घ्यावा असे आवाहन सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी आणि राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचे चेअरमन गुरुराज माळगे यांनी केले आहे.