सोलापूर : प्रिसिजनने सीएसआर अंतर्गत शालेय शिक्षणासाठी केलेल्या अतुलनीय कार्याची दखल घेत “इंडिया सीएसआर” च्या वतीने “एक्सलन्स इन सी एस आर” पुरस्कार देऊन सन्मानित केले.
प्राकृतिक शेतीचे पुरस्कर्ते, झिरो बजेट शेतीचे उद्गाते पद्मश्री सुभाष पाळेकर, ल्युपिन फाउंडेशनचे सीताराम गुप्ता यांच्या हस्ते व इंडिया सीएसआरच् प्रमुख रुसेन कुमार यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार देण्यात आला. प्रिसिजन कंपनीच्या वतीने जनसंपर्क अधिकारी माधव देशपांडे यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
प्रिसिजन फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. सुहासिनी शहा, प्रिसिजनचे चेअरमन यतिन शहा यांच्या मार्गदर्शनाखाली कंपनीच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून सोलापूर जिल्ह्यातील १६० पेक्षा अधिक शाळांमध्ये ई-लर्निंग किट, मिनी सायन्स सेंटर, अविष्कार, पासवर्ड कॅम्पेन, बैठक ॲट स्कूल असे विविध प्रकल्प राबवित आहे. जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर, मोहोळ, माढा तालुकायातील व शहरातील ५ शाळांमध्ये स्टेम लर्निंगच्या सहकार्याने “मिनी सायन्स सेंटर”ची उभारणी केली. यात ८० वर्किंग मॉडेलच्या माध्यमातून ५ वी ते १२ वी पर्यंतच्या अभ्यासक्रमातील १२० घटक शिकवले जातात. त्यासाठी सर्व शाळांतील शिक्षकांना प्रशिक्षणही दिले आहे. या मिनी सायन्स सेंटरच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना विज्ञान आणि गणित विषयांची गोडी लागावी, वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण व्हावा हा उद्देश होता. याच अभिनव प्रकल्पाची दखल घेऊन “इंडिया सीएसआर” संस्थेने “एक्सलन्स इन सीएसआर” पुरस्कारासाठी प्रिसिजनची निवड केली.