सोलापूर दिनांक – अल्पसंख्यांक समाजातील असंघटित कामगारांसाठी आशिया खंडातील सर्वात मोठी घरकुल योजनेसाठी संघर्ष करत असताना सोलापूरच्या स्थानिक काँग्रेस नेत्यांनी अनेक अडथळे आणले पण त्यावर मात करत ही योजना यशस्वी करून दाखवली.असे प्रतिपादन माजी आमदार व रे नगर फेडरेशनचे मुख्य प्रवर्तक कॉ.नरसय्या आडम यांनी केले.
१८ डिसेंबर अल्पसंख्याक अधिकार दिनानिमित्त अल्पसंख्याक हक्क संघर्ष समितीतर्फे शहापूर चाळ येथील शहीद अश्फाकउल्लाहखान सभागृह येथे विचार मंथन सभेचे आयोजन करण्यात आले होते.याप्रसंगी ते बोलत होते. पुढे बोलताना आडम मास्तर म्हणाले,ही घरकुल योजना २०१३ साली मंजूर झाली. या योजनेअंतर्गत केंद्र शासनाकडून अडीच लाख आणि राज्य शासनाकडून दोन लाख रुपये सबसिडी मिळणार होती.परंतु सोलापूरचे काँग्रेसचे नेते सुशीलकुमार शिंदे यांनी हा विषय कॅबिनेटमध्ये येऊ दिला नाही. त्यामुळे अल्पसंख्यांक समाजाला घरकुलसाठी मिळणाऱ्या सहाशे कोटी रुपयांना मुकावे लागले.

परिणामतः बँकेकडून कर्ज काढावे लागत आहे. बँकेकडून मिळणारे कर्ज वीस वर्ष फेडावे लागणार असल्याची खंत व्यक्त करत येत्या निवडणुकीत आमदार झालो तर रे नगर घरकुलच्या प्रत्येक सभासदाचे दोन लाख रुपये माफ करून आणल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असा निर्धार आडम मास्तर यांनी अल्पसंख्याक अधिकार दिनी व्यक्त केला.. याप्रसंगी उपस्थित असलेले अल्पसंख्यांक संघर्ष समितीचे राज्य निमंत्रक ऍड.एम.एच.शेख यांनीही आपले विचार व्यक्त केले. ऍड.शेख म्हणाले,२०१४ ला नरेंद्र मोदींचे शासन आल्यापासून अल्पसंख्यांक समाजच नव्हे तर देशातील आदिवासी आणि मागासवर्ग समाजावरदेखील अन्याय होत आहे.९ वर्षांच्या कार्यकाळात मोबलिंचींगच्या अनेक घटना घडल्या असून यात अनेक निष्पाप व निरपराधांचा बळी गेला असल्याचे सांगत त्यांनी संताप व्यक्त केला.पुढे बोलताना ऍड.शेख म्हणाले सोलापूरचा मोहसीन शेख हा मॉबलिंचींग चा पहिला बळी ठरला असून या दुर्घटनेला मुस्लिम समाज कधीच विसरू शकणार नाही. कार्यक्रमाच्या प्रारंभी अल्पसंख्यांक हक्क संघर्ष समितीचे जिल्हा समन्वयक कॉ.युसुफ मेजर यांनी प्रास्ताविक केले.
दरम्यान रे नगरचे मुख्य प्रवर्तक नरसय्या आडम यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन अल्पसंख्यांक हक्क संघर्ष समितीतर्फे सत्कार करण्यात आला. याप्रसंगी मंचावर माजी आमदार नरसय्या आडम, एड. एम.एच.शेख,कामिनी आडम,रे नगर फेडरेशनच्या चेअरमन नलिनी कलबुर्गी,अब्राहम कुमार, ऍड.रफिक शेख,अमित मंचले आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन म.हनिफ सातखेड यांनी केले. याप्रसंगी अल्पसंख्यांक समाजातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.