राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ११ मार्च रोजी महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त ज्ञानाचा दिवा लावूयात असं आवाहन केलं आहे. शरद पवार यांनी फेसबुकच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, “११ तारखेला महात्मा फुले यांची जयंती आहे. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी आपल्याला ज्ञानाचा, एकतेचा संदेश दिला. त्यामुळे ज्ञानाचा दिवा लावून एक दिवा ज्ञानाचा या प्रकारचा संदेश देण्यासाठी योग्य दिवस आहे”. शरद पवारांनी यावेळी १४ तारखेला बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीलाही एक दिवा संविधानाचा लावून साजरी करुयात असं आवाहन केलं.
“१४ तारखेला बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे. महिनाभर आपण ती साजरी करतो. पण यावेळी आपण एक दिवा संविधानाचा लावून त्यांची जयंती साजरी करुयात. जयंतीला उत्सवाचं स्वरुप येणार नाही याची खबरदारी घेऊयात. गर्दी टाळूया तसंच एकमेकांमध्ये किमान अंतर राहील याची काळजी घेऊया आणि सर्व परिस्थितीवर मात करुयात,” असं शरद पवारांनी म्हटलं आहे. पुढे ते म्हणाले की, “बाबासाहेब आंबेडकरांबद्दल बोलताना एक गोष्ट सांगावीशी वाटते ती म्हणजे बाबासाहेबांनी कधीही अंधश्रद्धेला समर्थन दिलं नाही”. कधीही अंधश्रद्धेच्या मागे जाऊ नका. माणसानं चिकित्सक असं पाहिजे. अंधश्रद्धेचं समर्थन करु नका असं यावेळी शरद पवारांनी सांगितलं.