जोहान्सबर्ग : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळल्या जात असलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात अर्शदीप सिंग आणि आवेश खान या दोघांच्या दमदार गोलंदाजीमुळे भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेचा डाव अवघ्या 116 धावांत गुंडाळला. ‘द वांडरर्स’ येथे खेळल्या जात असलेल्या या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडन मार्करमने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्याचा हा निर्णय आत्मघातकी ठरला. वेगवान गोलंदाजांना सुरुवातीपासूनच खेळपट्टीची जबरदस्त मदत मिळाली. सामन्याच्या दुसऱ्याच षटकात अर्शदीप सिंगने सलामीवीर रीझा हेंड्रिक्सला (0) बोल्ड केले. अर्शदीपने पुढच्याच चेंडूवर रॅसी व्हॅन डर डुसेनलाही (0) बाद केले.
अर्शदीपने पहिले चार बळी घेतले
टोनी डी जॉर्जी आणि एडन मार्करम यांनी काही काळ डावावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला होता. 42 धावांवर टोनीला (28) अर्शदीपने बाद केला. स्कोअरबोर्डवर 10 धावांची भर पडताच हेनरिक क्लासेनही बाद झाला. अर्शदीपने त्यालाही पॅव्हेलियनमध्ये पाठवले. अशा प्रकारे अर्शदीपने पहिले चार विकेट घेतल्या.