येस न्युज मराठी नेटवर्क (अविनाश व्यंकटेश कुलकर्णी ) : माजी खासदार सादुल यांच्या निधनाने सोलापूरच्या पूर्व भागातील शांत , संयमी व विकासाची दूरदृष्टी असलेले व्यक्तिमत्व हरपले आहे. त्यांचा जन्म १९४३ मध्ये एका गरीब हातमाग विणकर कुटुंबात झाला . तरुण वयातच ते समाज कार्याकडे आकृष्ट झाले.सोलापूर शहर युवक काँग्रेसच्या सर चिट नीस पदाची धुरा यशस्वीपणे सांभाळून आपल्या कार्याची चुणूक दाखवली.१९७५ व १९८५ च्या पालिका निवडणुकीत ते मोठ्या मताधिक्याने काँग्रेसतर्फे निवडून आले होते.१९८९ मध्ये सोलापूर पालिकेचे महापौरपद भूषवण्या ची संधी त्यांना मिळाली. विनम्र व शालीन व्यक्तिमत्वामुळे त्यांची या पदावर पक्षश्रेष्ठींनी निवड केली. ते महापौर असताना तत्कालीन काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष प्रतिभाताई पाटील यांनी त्यांना १९८९ लोकसभा निवडणुकीत सोलापूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसची उमेदवारी मिळवून दिली. या निवडणुकीत त्यांनी भाजपचे लिंग राज वल्याल यांचा १.३५ लाखांचे मताधिक्य मिळवून पराभव केला व काँग्रेसची ही जागा कायम राखली होती. १९९१ मध्ये झालेल्या लोकसभा मुदतपूर्व निवडणुकीत त्यांनी भाजप चे गोपीकिसन भुतडा यांचा ८३ हजारांनी पराभव करून दुसऱ्या वेळेस निवडून येण्याचा मान मिळवला होता. १९९६ लोकसभा निवडणुकीत मात्र त्यांना भाजपचे लिंग राज वल्याळ यांच्याकडून पराभूत होऊन तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. जनता पक्षाचे रविकांत पाटील या निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकावर होते.
ते खासदार असताना सिध्देश्वर एक्स्प्रेस ची वेळ सोयीची करून ही गाडी फलाट क्रमांक १ वर घेतली. विजापूर रस्त्यावरील अरुंद रेल्वे पुलाचे रुंदीकरण , सोलापूर ते हुबळी मीटर गेज रेल्वे मार्गाचे ब्रोडगेजमध्ये रूपांतर, दौंड गुलबर्गा दुहेरी रेल्वे मार्ग आदी मागण्याचा त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. प्रतीक्षा यादीतील दूरध्वनी ग्राहकांना दूरध्वनी उपलब्ध करून दिली. अनेक गावांमध्ये दूरध्वनी केंद्र त्यांनी उपलब्ध करून दि ले. ३ हजारपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या गावांमध्ये टपाल कार्यालय त्यांनी सुरू करून घेतले तसेच अक्कलकोट व मंगळवेढे येथे दूरदर्शनचे लघुप्रक्षेपण केंद्र मंजूर करून घेतले होते. ज्या बँकेत लिपीक म्हणून काम पाहिले त्या बँकेचे १९८० ते १९८३ या कालावधीत अध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी त्यांना प्राप्त झाली. ते खासदार असताना कुंभारी येथे शारदा सहकारी सूत गिरणी उभारण्यासाठी माजी महापौर जनार्दन कार मपुरी यांना त्यांनी मोलाची साथ दिली. या गिरणीचे अध्यक्षपद त्यांनी काही वर्षे सांभाळ ले सोलापुरातील यंत्रमागधारक यांच्या समस्या त्यांनी शासन दरबारी मांडल्या. पॉवर लूम बोर्डाचे सदस्य म्हणून त्यांनी काम पाहिले होते. अलीकडेच ते काँग्रेस सोडून तेलंगणाच्या बी आर एस पक्षात सामील झाले होते.परंतु तेथे ते रमले नाहीत. माजी पंतप्रधान पी . व्हीं . नरसिंहराव , शरद पवार , सुशीलकुमार शिंदे , विलासराव देशमुख आदी मान्यवर नेत्यांशी त्यांचे आपुलकीचे व जिव्हाळ्याचे नाते होते. पूर्व भागात उद्योग बँकेतर्फे गणेशोत्सवात नामवंत वक्त्यांची भाषणे होण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला होता. शांत व निगर्वी व्यक्तिमत्व असलेल्या सादुल यांना सर्व पत्रकरां तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली.