संत सावतामाळी यांच्या विचारांचा वारसा पुढं नेणारे सर्वज्ञानी सिद्ध पुरुष संत माळी अप्पा होय. त्यांच्या पदस्पर्शाने पुनित झालेली तुळशीची कर्मभूमी आहे. संत माळी अप्पांनीच तुळशी गावातील लोकांच्या सहाय्याने पंढरपूर येथील विठ्ठल मंदिरातील अखंड वीणा चालू ठेवण्याची जबाबदारी उचलली.याच पुण्यभूमीत आणखी एक योगतपस्वी जन्मास आले… वैधव्यात आपला एकुलता एक अंकुर जपून नेकीनं कष्टणा-या आजी सुगंधाआईनं अगोदरच देवा विठ्ठलाच्या चरणी नतमस्तक होऊन बोलली मला आता जे चवथं नातवंड होईल ते तुझ्या कार्यासाठी वाहीन. तेच हे गोरं गोंडस चित्रकला,खेळ,कलाकौशल्यात निपुण असलेलं बाळ दत्तात्रय जन्माला आलं. वडील पंढरीनाथ आई काशीबाई यांच्या पोटी जन्मलेलं बाळ दिसांमासंने वाढू लागलं पण नियतीला हा आनंद मंजूर नव्हता की काय? आई काशीबाई यांचं अकाली निधन झालं.आईचं छत्र हरपलं. लहान पाठची सहा महिन्याची बहिण , मोठा मुलगा विठ्ठल व भामाबाई,भगवान, दत्तात्रय, सोनाबाई .अशी तीन मुलं व दोन मुली पदरी सोडून सुन काशीबाईचं देहावसान झालं. लहान मुलांची आबाळ होऊ नये म्हणून आजीनं मुलाला दुसरं लग्न न करण्याची शपथ घातली.पुन्हा सुगंधा आजीला पोराबाळांसाठी खंबीरपणे उभं रहावं लागलं ….
वडील पंढरीनाथ तेवढेच चारित्र्यवान व आईच्या शब्दाला शिरसावंद्य मानून निष्ठेने चालत राहिले. मुखी हरिनाम व शेतातील कष्ट करत राहिले. लहानग्या सहा महिन्यांच्या सोनासह घराला जपत होते..... दिवस पलटत होते मोठा विठ्ठल नोकरी सोडून गावी आला व लवकर लग्न केल्याने पत्नी सौ. मथुराबाईनंही घराच्या जबाबदारी घेतली. नंतर भगवान सौ.यशोदा शेतात मदत करत..असा सर्वांचा लाडका दत्ता बापू सर्वांच्या नजरेत लहानाचा मोठा झाला . चांगलं उच्च शिक्षण घेतलं, प्रशासकीय सेवेत उच्च पदावर निवड होऊनही काही पैशाअभावी टेंभुर्णी येथे खेळाचे प्राध्यापक म्हणून कार्यरत झाले.
नित्यनेमाने व्यायाम व निरानरसिंगला दर शनिवारी पळत दर्शनास जाऊन येणं. जोडीला योग होताच.पुढं याच नित्यकर्माची गोडी व परमेश्वर भक्ती व प्राप्तीची ओढ लागली . पहाटे २ ला ब्रम्ह मुहूर्तावर उठावे साधनेसाठी बसावं असं ३०-४० वर्षं चालू होते.यासाठी अन्नत्याग केला केवळ फलाहार घेत असत.यासाठी अर्धांगिनी सौ. शारदा यांची साथ लाभली. त्यांचही योगदान फार महत्त्वाचे आहे.
अक्कलकोटच्या स्वामी समर्थ यांच्या भक्तीची पताका त्यांनी खांद्यावर घेतली. एके दिवशी पाडव्याच्या पहाटे गुरूंचा अनुग्रह प्राप्त झाला.. साधकांना संरक्षित असं कवच व वलयं असतात.या माध्यमातून जेवढी पावित्र्यता असते तेवढीच त्या त्या स्तरात, वर्तुळात ते जोडले जातात. तसेच इथंही घडलं... श्रद्धा भक्ती व पावित्र्य,आचार,आहार,विहार, विचार यांवर आधारित या सर्व गोष्टी आहेत. या कसोटीवरच बापूंनी निर्णय घेतला! निरानरसिंगच्या संगमावर ४० दिवसाचं अनुष्ठान करायचं!! अन्नपाणी त्यागून रात्रंदिवस संगमावर थांबून ४०दिवस साधना पुर्ण करणं!! ! इथं अनुष्ठान करायचं म्हणजे सुळावरची पोळीच होती.. कित्येकजण इथं येऊन अनुष्ठान अर्धवट सोडून गेले होते.. कैक जणांना भयानक परिस्थितीचा सामना करावा लागला होता.. आयुष्यातून उठलेली जातात...
नोकरी,घरातील जबाबदारी, अनुराधा, अर्चना,आनंद, शुभांगी,दिपक या मुलांची शिक्षणं सौभाग्यवतीची नौकरी, नातीगोती शेती सर्व पाहून आणि या समयी सर्व त्याग करून समतोल साधून खूप मोठा निर्णय घेतला. भावनेला कर्मभक्तीनं जिंकून साधक अनुष्ठानाला सिद्ध झाला. निरानरसिंगच्या संगमावर थांबून रात्रंदिन साधनेतील नवनवीन आव्हानांना सामोरे जावून अखेर अनुष्ठान पुर्ण केले. अंर्तबाह्य उजळून गेले.यावेळी जे अनुभव आले ते हातानं साधना,जप करताना लिहता येत नव्हते तरी टिपणं लीहली आहेत.ती आम्हा उभयतांना सांगत व वेळ काढून या आणखी पहा व बोलू म्हणत.. मी म्हणे मामा या विषयांवर आणखी लिहा.. पण ते म्हणत तो अनुभवण्याचा विषय आहे...
एवढं मात्र बापू सांगतात की, या निरानरसिंगच्या संगमावरचं स्थान पवित्र आहे, पण इथं अनुष्ठान पुर्ण करणं अवघड आहे. इथं फक्त समर्थ रामदास व स्वामी समर्थ यांचं व यानंतर माझं म्हणजे दत्तात्रय चव्हाण यांचं अनुष्ठान पुर्ण झाले आहे! एक ऐतिहासिक अलौकिक आनंदाला स्वामी योगानंद आपण पात्र झालात !! केवढं सामर्थ्य मिळवलंय आपण . केवढा परमभाग्याचा क्षण !! यानंतरच स्वामी योगानंद या गुरुवर्यांच्या उपाधीला आपण पात्र ठरलात , तेच नाव त्यांना बहाल केले,ते त्यांनी स्वीकारले. एका व्यक्तीकडे योग, भक्ती,साधना व मुमुक्षुता व नम्रता होती म्हणूनच हे शक्य झाले.कारण ते यांविषयी लिहायला, बोलायला टाळत . पण मला रहावलं नाही म्हणून हा लेखनप्रपंच..
साधना व भक्तीसाठी वयोमानानुसार व वेळेमुळं कुठं जायचं म्हणून इथंच टेंभुर्णीत स्वामीभक्त व स्वामी योगानंदांवरच्या गाढ निष्ठेने, सहकार्यानं स्वामी समर्थांच्या भव्य मूर्तीसह मंदिर उभारले.एक संस्था कार्यान्वित केली.. इथं अनेक निष्ठावंत जीवाभावाची माणसं लाभली.. अनेक भक्तांना लाभ, अनुभवाची प्राप्तीही झाली आहे. हा व्याप वाढला गेला. ८-९ वर्षं झाली अक्कलकोटला स्वामींच्या नावे दिंडीही निघत आहे. अनेक अनुभव आलेले भक्तगण चमत्कार ,अनुभव कथन करत असतात.सारंच समजून घेणं हा एक अलौकिक आनंद असतो. ज्यांचं पुण्यं त्यालाच त्याचं आकलन व गोडी असते.
एकंदर तुळशीच्या चव्हाण परिवारातील सुगंधा आजीचं स्वप्न दत्तात्रयानं पुर्णत्वास नेलं.धन्य ती आजी सुगंधा ! धन्य तो नातू ! ! आजी बरोबरच आईवडिलांच्या सात्विकतेचं व सेवेचं फळही लाभलं.हीच धुरा पुढं पुतण्या धनंजय, भाची सौ. सुवर्णा व चिरंजीव आनंद पुढं नेत आहेत.. सात्विक विचारांला सात्विक फळंच येतात... तुळशीच्या वीणेतील आणखी एक योगतपस्वी त्याच्या अलौकिक परमानंदाने झंकारुन उजळून न्हाला व टेंभुर्णी नगरीत विसावला.. ...
प्रो.डाॅ.सौ.सुवर्णा धनंजय चव्हाण – गुंड

