नागपूर : चार राज्यांतील निवडणुकांच्या निकालांनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. या विजयाचं श्रेय हे पंतप्रधान मोदी, अमित शाह आणि जे.पी नड्डा यांचं आहे. मोदींवरील विश्वासाचं हे यश असल्याचं यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं. हा अभूतपूर्व निकाल असून जनतेच्या मनात काय आहे याची ही नांदी असल्याची प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीसांनी दिली.
राष्ट्रीय अध्यक्ष आणि त्या त्या राज्यातली जी काही भाजपची टीम आहे आणि आमची राष्ट्रीय टीम आहे या सगळ्यांचं हे श्रेय आहे आणि म्हणून या सगळ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. भारतीय जनता पक्षाची मतं दहा टक्केपेक्षा देखील जास्त वाढलेली आहे आणि विशेषतः छत्तीसगड राजस्थानमध्ये मोठ्या प्रमाणात ही टक्केवारी आहे. मध्य प्रदेशमध्ये आठ टक्क्यानी ती मतं वाढली असल्याची माहिती यावेळी देवेंद्र फडवीसांनी दिली.
इंडिया आघाडीला लोकांनी नाकारलं : फडणवीस
इंडिया आघाडीला जनतेने आता नाकारलं आहे. त्यामुळे राहुल गांधी यांच्या अजेंडाला देखील लोकांनी नाकारलं आहे. आपल्या एक गोष्ट स्पष्ट झाली आहे जी इंडिया तयार झाली होती त्या इंडिया आघाडीला लोकांनी नाकारलेला आहे. याची मला पूर्ण खात्री आहे तर त्यांनी कोणावरही खापर फोडलं तरी देखील जनता ही मोदीजींच्याच पाठीशी आहे मला हे देखील नमूद केलं पाहिजे. हीच परिस्थिती महाराष्ट्रात देखील आहे महाराष्ट्रामध्ये नुकत्याच ग्रामपंचायतच्या निवडणुकीमध्ये आपण बघितलं दोन तृतीयांश ग्रामपंचायत आणि लोकसभेमध्ये देखील तेच आपल्याला पाहायला मिळालं, असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं.