उत्तराखंडमध्ये चारधाम प्रकल्पाचा भाग असलेल्या सिलक्यारा ते बारकोट या पाच किलोमीटरच्या बांधकामाधीन बोगद्याचा काही भाग १२ नोव्हेंबरला कोसळला. बोगद्याच्या सिलक्यारा दिशेकडील सुमारे ६० मीटरचा भाग खचल्याने ४१ कामगार अडकले होते. बोगद्याच्या बांधून तयार असलेल्या दोन किलोमीटर भागात हे कामगार अडकले होते. या ४१ कामगारांना तब्बल १७ दिवसांनी बाहेर काढण्यात बचावपथकांना यश आलं आहे.
कामगार बोगद्यात अडकल्यापासून सातत्याने त्यांच्या बचावासाठी प्रयत्न सुरू होते. बोगद्यातील ढिगाऱ्यात खोदकाम करण्यासाठी ऑगर मशीन मागवण्यात आले होते. परंतु, हे मशिन सातत्याने नादुरुस्त ठरत होते. अखेर हे मशीन निकामी झाले. त्यामुळे, यंत्राची मदत न घेता कामगारांमार्फत खोदकाम करण्याबरोबरच अन्य पर्यायांचा विचार सुरू असल्याचे आंतरराष्ट्रीय बोगदा तज्ज्ञ अरनॉल्ड डिक्स यांनी शनिवारी सांगितले होते. सुरुवातीला दोन कामगांरांना बाहेर काढण्यात आलं आणि नंतर इतरांनाही बाहेर काढण्यात आलं. या बांधकामाच्या ठिकाणी तात्पुरतं रुग्णालय तयार ठेवण्यात आलं. तसेच या ठिकाणी अँब्युलन्सही तयार ठेवण्यात आली होती. बांधकामाच्या ठिकाणाहून मुख्य रुग्णालय हे 30 किमीच्या अंतरावर असल्याची माहिती आहे. त्यामुळे या कामगारांच्या वैद्यकीय तपासणीसाठी बांधकामाच्या ठिकाणीच तात्पुरत्या रुग्णालयाची सोय करण्यात आली. या कामगारांच्या सुटकेसाठी संपूर्ण देश आतूर झाला होता. या घटनेला आता 17 दिवस झालेत. प्रचंड कष्ट, अत्याधुनिक यंत्रणांच्या मदतीने या कामगारांसाठी अन्न-पाणी, मोबाईल, तणाव कमी करण्यासाठीच्या वस्तू पाठवण्यात आल्या, आता त्यांची सुटका करण्यात आली आहे. कामगारांच्या सुटकेसाठी देशभरातील विविध यंत्रणा उत्तराखंडमध्ये एकवटल्या. नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स (NDRF), उत्तराखंड स्टेट डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स, बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन (BRO), नॅशनल हायवेज अँड इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (NHIDCL), जे प्रकल्प बांधत आहेत आणि इंडो-तिबेट बॉर्डर पोलिस (ITBP-Indo Tibetan Border Police) यासह विविध एजन्सी बचाव कार्यात सहभागी आहेत.