श्री मोरया प्रतिष्ठान आणि दत्ततारा ग्रुपतर्फे जुळे सोलापूरात किर्तन महोत्सव
सोलापूर : मनुष्याला आनंदी जगण्याची दिशा संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींनी दाखवली. आनंदप्राप्तीसाठी संतांनी समाजाला परमार्थाचा मार्ग दाखवला आहे, असे प्रतिपादन हभप सुधाकर महाराज इंगळे यांनी केले.श्री मोरया प्रतिष्ठान आणि दत्त तारा ग्रुपतर्फे जुळे सोलापुरातील के. एल. ई. शाळेच्या मैदानावर आयोजित किर्तन महोत्सवाचे उद्घाटन गुरुवारी झाले. महोत्सवाच्या पहिल्या दिवशी ह. भ. प. श्री सुधाकर महाराज इंगळे यांनी म र्गदर्शन केले. प्रारंभी हरिपाठ झाला. यानंतर ह. भ. प. श्री लक्ष्मण महाराज चव्हाण यांचे प्रवचन झाले. यानंतर ह. भ. प. श्री सुधाकर महाराज इंगळे यांचे किर्तन झाले.
ते म्हणाले, आयुष्यात सत्संग अत्यंत गरजेचा आहे. देवाचे द्वार आणि देवळाचे द्वार यांतील फरक समजुन घेतला पाहिजे. देव समजून घेण्यासाठी आपल्याला आयुष्य मिळाले आहे. देवाचा स्वीकार विवेकाने करावा, असे चिंतन संतांनी मांडले आहे, असेही श्री. इंगळे महाराज यांनी सांगितले. किर्तन महोत्सवात रविवार (दि. १९) पर्यंत दररोज दुपारी ४ ते ५ हरिपाठ, सायंकाळी ५ ते ६ वाजेपर्यंत प्रवचन आणि सायंकाळी ७ ते रात्री नऊ वाजेपर्यंत हरिकीर्तन होणार आहे, असे श्री मोरया प्रतिष्ठानचे अध्यक्ष अविनाश काळे आणि दत्त तारा ग्रुपचे अध्यक्ष विपुल भोपळे यांनी सांगितले. नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन संयोजकांनी केले आहे.
किर्तन महोत्सवात आज
किर्तन महोत्सवात आज शनिवारी (दि. १८) ह. भ. प. रमेश महाराज शिवापुरकर यांचे प्रवचन होईल. तसेच श्री संत माणकोजी बोधले महाराज यांचे वंशज श्रीगुरु ह. भ. प. डॉ. जयवंत महाराज बोधले यांचे कीर्तन होईल.