सोलापूर- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील संगणकशास्त्र संकुल, क्विक हिल फॉउंडेशन, पुणे व महाराष्ट्र पोलीस प्रशिक्षण केंद्र, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने “सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा” कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी संगणक शास्त्र संकुलातील विद्यार्थी आणि उपस्थित पोलीस बांधवांना सायबर सिक्युरिटीचे धडे दिले.
कार्यक्रमाच्या सुरवातीस डॉ. आर. एस. मेंते यांनी प्रास्ताविक केले. संगणकशास्त्र संकुलातील पंकज गुरव, चरिता जवळकोटी व प्रशांत यादव या विद्यार्थ्यांनी “सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा” या विषयावर व्याख्याने दिली. या व्याख्यानामध्ये त्यांनी आजच्या ऑनलाइन युगामध्ये होणाऱ्या विविध प्रकारच्या फसवणुकीबद्धल उदाहरणाद्वारे माहिती दिली. अश्या प्रकारच्या फसवणुकी होऊ नये म्हणून त्याबद्धल सर्वानी काळजी घेण्याविषयी सविस्तर माहिती दिली. OTP कोणास सांगू नये, अनोळखी नंबर वरून आलेले फोन कॉल्सची पडताळणी करून घेणे, whatsapp व इतर सोशल मीडियावर आलेल्या मेसेजेस व लिंकची शहानिशा करावी व त्यानंतरच पुढील प्रक्रिया करावी. पासवर्ड स्ट्रॉंग वापरून आपली माहिती सुरक्षीत करावी तसेच आपली माहिती हि आपली जबाबदारी आहे असे सांगितले. मोबाईल, कॉम्पुटर, लॅपटॉप इत्यादी साधनावर अधिकृत अँटीव्हायरसचा वापर करावा. ज्योती इंगोले हिने मोबाईल मधील विविध सेटिंग्जची माहिती दिली. वैष्णवी स्वने हिने सर्वाना सायबर सुरक्षेतेची शपथ दिली. कपिल कोळवले या विद्यार्थ्याने कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण केले.
विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रकाश महानवार, कुलसचिव योगिनी घारे व संकुलाचे संचालक प्रा. व्ही. बी. घुटे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. तसेच पोलीस प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य वैशाली कडुकर, उपप्राचार्य अनुराधा उदमले, क्विक हिल फॉउंडेशनचे श्री. अजय शिर्के, सुगंधा दानी व गायत्री पवार यांनी सहकार्य केले. या कार्यक्रमास उपप्राचार्य अनुराधा उदमले, पोलीस निरीक्षक महादेव नाईकवाडे, लोणकर सर, इतर पदाधिकारी व एकूण १४०० पोलीस प्रशिक्षणार्थी उपस्थित होते. प्रियांका चव्हाण हिने सायबर सुरक्षेवर आधारित कविता सादर केली व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. तसेच कार्यक्रमाचा समारोप दीपाली साळुंखे हिच्या आभार प्रदर्शनाने झाला.