सोलापूर जिल्ह्यामध्ये महामार्गांचे मोठे जाळे असून प्रवाशी वाहतुकीसोबत मालवाहतूक वाहनांची संख्या वाढतच चालली आहे. यातील बरीचशी वाहने शासकीय नियम डावलून परिवहन खात्याकडून निर्गमित आकारणी क्षमतेपेक्षा जास्त वजन भरून वाहतूक करत आहेत. अनेकदा विविध रस्त्यांवर ओव्हरलोड वाहनांच्या नादुरुस्तीने रस्त्यांवर अडथळा निर्माण होऊन चक्का जाम होत आहेत. त्याचबरोबरबर ओव्हरलोड वाहनांमुळे वाहने अनियंत्रित होऊन अपघातांचे प्रमाण वाढले आहे. ह्यामध्ये कोविड काळात चालू करण्यात आलेल्या एसटी महामंडळाची कार्गो मालवाहतूकही पासिंग पेक्षाही जास्त माल भरून ओव्हरलोड वाहतुकीत कमी नाहीत.
परिवहन खात्याकडून वाहनाच्या मालवाहतूक करण्यासाठी आकारलेल्या क्षमतेपेक्षा पेक्षा जास्त जड-अवजड वाहतूक करणाऱ्या जिल्ह्यातील सर्व मार्गांवरील वाहनांची वेळोवेळी तपासणी करणे गरजेचे आहे. रस्त्यावरील अपघातांमुळे वाढते मृत्यूचे प्रमाण कमी करणेकामी ओव्हरलोड वाहतूक करणाऱ्या वाहनांवर व बेजाबदार वाहनचालकांवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी. अन्यथा सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी सनदशीर मार्गाने उग्र आंदोलन करण्यात येईल याची योग्य ती दखल घेण्याविषयीचे निवेदन सोलापूरचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड यांना देण्यात आले.
आरटीओ गायकवाड यांनी या विषयासंदर्भात जिल्ह्यातील सर्व कंपनी चालक, ट्रान्सपोर्टर्स, मोटार चालक मालक यांची संयुक्त बैठक घेऊन पुढील योग्य ती कारवाई कार्तिक वारी नंतर करू असे खात्रीशीर आश्वस्त केले. यावेळी संभाजी आरमारचे संस्थापक श्रीकांत डांगे, कार्याध्यक्ष शिवाजी वाघमोडे, जिल्हाप्रमुख अनंतराव नीळ, उपजिल्हाप्रमुख राजेश पाटील संभाजी आरमार मोटार चालक मालक संघटनेचे सदस्य बंदेनवाज पठाण, फय्याज नगरवाले, शकील शेख, सिद्धाराम दुधाळे, रमेश जाधव, नामदेव पांढरे, शिवानंद कलशेट्टी, सुरेश पुजारी, सतीश मुलीया, बाबा पांढरे आदींसह बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.