सोलापूर : मंगळवार दि. ७ नोव्हेंबर २०२३ रोजी दत्त नगर येथील लाल बावटा कार्यालयात रे नगरच्या लाभार्थ्यांचे नवीन जोडणी नोंदणी प्रक्रियेचा शुभारंभ जिल्हा अधीक्षक अभियंता मा. धर्मराज पेटकर यांच्या शुभहस्ते करण्यात आला आहे. यावेळी सर्व लाभार्थ्यांनी एकमेकांना गोडधोड भरवत आनंदोत्सव साजरा केले.
पंतप्रधान आवास योजना अंतर्गत कुंभारीत ३० हजार असंघटीत कामगारांचा महत्वाकांक्षी गृहनिर्माण प्रकल्प साकारत आहे. या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील १५ हजार घरांचे हस्तांतरण पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते डिसेंबर महिन्यात होणार आहे. त्या अनुषंगाने त्या ठिकाणी पायाभूत व मुलभूत सोयी सुविधांची तयारी चालू आहे. परंतु २१ जानेवारी २०२२ रोजी रे नगरच्या लाभार्थ्यांना मीटर सह नवीन वीज जोडणीकरिता १०३०८ रुपये अनामत भरण्यासंबंधीची नोटीस संस्थेला देण्यात आली होती.
याबाबत रे नगर च्या लाभार्थ्यांना नाममात्र ५००/- रुपये दरात मीटरसह नवीन वीज जोडणी करून मिळावी याकरिता मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, ग्रामविकास मंत्री, पालकमंत्री, विभागीय आयुक्त, मुख्य अभियंता, बारामती, मा. अध्यक्ष / व्यवस्थापक महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी, मुंबई आदींशी पत्र व्यवहार व बैठकीचे सत्र झाले. मात्र निर्णय लागू शकला नाही. म्हणून गुरुवार दि. २ नोव्हेंबर २०२३ रोजी रे नगर च्या ४० हजार लाभार्थ्यांसह शहरातील हजारो नागरिकांना घेऊन महामोर्चाद्वारे जिल्हा परिषद येथे धरणे आंदोलन करण्यात आले. या जन आंदोलनाचे मा. मुख्य अभियंता महावितरण मुख्य कार्यालय मुंबई व मा. मुख्य अभियंता महावितरण बारामती यांनी दि. ६ नोव्हेंबर रोजी मा. अधीक्षक अभियंता महावितरण सोलापूर यांना नाममात्र दरात मीटरसह नवीन वीज जोडणी देण्याचे आदेश जारी केले. त्यानुसार मा. अधीक्षक अभियंता महावितरण सोलापूर यांनी रे नगरचे मुख्यप्रवर्तक मा. कॉ. नरसय्या आडम (मास्तर) यांना लेखी पत्राद्वारे कळविले.
या प्रसंगी मार्गदर्शन करताना कॉ. नरसय्या आडम (मास्तर) म्हणाले कि, सर्व श्रमिक कष्टकरी यांनी एकजुटीने संघर्ष करून शासनाला निर्णय घेण्यास भाग पाडले. महाराष्ट्र शासन आर्थिक दुर्बल घटकातील असंघटीत कामगारांच्या परिस्थितीचा आणि आर्थिक क्षमतेचा सारासार विचार करून नाममात्र ५०० रुपये दरात मीटरसह नवीन वीज जोडणी करण्याचे आदेश पारित केले. याबद्दल महाराष्ट्र शासनाचे रे नगर फेडरेशनच्या वतीने जाहीर आभार व्यक्त केले. असेच लोकाभिमुख सहकार्य शासनाने करावे अशी आशा व्यक्त केले. संपूर्ण वसाहत नंदनवन होईपर्यंत लाभार्थ्यांनी असेच लढ्याच्या मैदानात उतरावे आजचा हा आनंदाचा क्षण लढाऊ कामगारांमुळे आलेला आहे. त्यांचेही आभार मानले.
या प्रसंगी व्यासपीठावर रे नगर फेडरेशनचे चेअरमन कॉ. नलिनीताई कलबुर्गी, सेक्रेटरी कॉ. युसुफ शेख (मेजर), माकपा च्या नगरसेविका कामिनिताई आडम, कार्यकारी अभियंता प्रशासन मा. संजीवकुमार शिंदे, कार्यकारी अभियंता मा. रमेश राठोड, उप कार्यकारी अभियंता मा. राजूकुमार कलशेट्टी, सहाय्यक अभियंता मा. महेश शिंदे आदींचा रे नगर फेडरेशनच्या वतीने सत्कार करण्यात आला. कॉ. सिद्धप्पा कलशेट्टी, कॉ. मुरलीधर सुंचू, वीरेंद्र पद्मा, दाऊद शेख, रंगप्पा मरेड्डी, बाळकृष्ण मल्याळ,सनी शेट्टी आदींची उपस्थिती होती. सूत्र संचालन व आभार प्रदर्शन अड. अनिल वासम यांनी केले.