सोलापूर : राजस्थानी संगीताचा इतिहास, भारतीय संगीत क्षेत्रातील योगदान अन् कर्णमधुर राजस्थानी संगीतात सोलापूरकर रंगून गेले. प्रिसिजन फाऊंडेशन आयोजित तीन दिवसीय ‘प्रिसिजन गप्पा’ चा सांगीतिक समारोप रविवारी श्री शिवछत्रपती रंगभवन सभागृहात झाला.
रविवारी समारोपाच्या दिवशी राजस्थानी कलाकारांचा ‘पधारो म्हारे देश’ हा कार्यक्रम सादर झाला. प्रारंभी प्रिसिजन उद्योग समूहाचे चेअरमन यतीन शहा, प्रिसिजन फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. सुहासिनी शहा, प्रिसिजन उद्योग समूहाचे कार्यकारी संचालक करण शहा, संचालक रवींद्र जोशी, प्रिसिजन फाउंडेशनच्या संचालिका मयूरा शहा यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात झाली.
यावेळी जैसलमेर येथील राजस्थानी कलाकार बादल खान मंगनीयार, हकीम खान मंगनीयार, मुलतान खान मंगनीयार आणि कुतला खान मंगनीयार या कलाकारांशी कुलदीप कोठारी आणि मंदार करंजकर यांनी संवाद साधला.’महाराज गजानन आओ, म्हारी सभा में रंग बरसाओ’ या पहाडी आवाजातील गणेश वंदनेने सादरीकरणाची सुरुवात झाली. यानंतर बधावा हा स्वागताचा प्रकार मुलतान खान मांगलियार आणि बादल खान मांगलीयार यांनी सादर केला.


लोकसंगीत आणि शास्त्रीय संगीताचा अजोड मिलाफ या कार्यक्रमातून सोलापूरकर रसिकांना अनुभवता आला. राग शामेलीमधील ललबी गीतप्रकार कलावंतांनी सादर करताच रसिकांनी टाळ्यांचा कडकडाट करून त्यांना दाद दिली. ‘मुखे तख्त चढायो हीर, तकदिर बनायो फकीर’ हे राजस्थानी लोकसंगीतातील सुप्रसिद्ध गीत सादर करून राजस्थानी कलाकारांनी रसिकांची दाद मिळवली.
संवादक मंदार कारंजकर म्हणाले, तब्बल १३० हून अधिक वाद्ये आणि ४० हून अधिक गाण्याच्या जाती असलेले राजस्थानी संगीत म्हणजे हिंदुस्थानी संगीतातील मोलाचा ठेवा आहे. कुलदीप कोठारी म्हणाले, राजस्थानी कलावंत यजमानी संगीताचे उपासक आहेत. यांच्या तब्बल ३५ ते ४० पिढ्या संगीताच्या सेवेत आहेत. भक्तीसोबत संवेदनेची जाणीव हे राजस्थानी संगीताचे वैशिष्ट्य आहे.
याप्रसंगी प्रिसिजन उद्योग समूहाचे चेअरमन यतीन शहा, प्रिसिजन फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. सुहासिनी शहा, प्रिसिजन उद्योग समूहाचे कार्यकारी संचालक करण शहा, संचालक रवींद्र जोशी, प्रिसिजन फाउंडेशनच्या संचालिका मयूरा शहा आदी उपस्थित होते. प्रिसिजन उद्योग समूहाचे मुख्य जनसंपर्क अधिकारी माधव देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले.
मूल रडते सुरातच….
राजस्थानी समाजाचे संगीताशी अतूट नाते आहे. राजस्थानात व्यक्तीच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत प्रत्येक चांगल्या – वाईट टप्प्यावर संगीताची भेट होते. इतकेच नव्हे तर राजस्थानातील मुलही रडताना सुरातच रडते अशी मिश्किल टिप्पणीही मुलतान खान मांगनीयार यांनी यावेळी केली.