मुंबई: शिवसेना आमदारांच्या अपात्रतेच्या सुनावणी पुढची सुनावणी ही 21 नोव्हेंबर रोजी होणार आहे. या प्रकरणाची कागदपत्रे ही 16 नोव्हेंबरपर्यंत सादर करावी लागणार आहेत. दीड तास झालेल्या आजच्या युक्तिवादावेळी व्हिपच्या मुद्द्यावरून ठाकरे आणि शिंदे गटाच्या वकिलांमध्ये जोरदार युक्तीवाद झाला. आमदारांना जारी करण्यात आलेला व्हिप हा ई मेलच्या माध्यमातून पाठवण्यात आल्याचा दावा ठाकरे गटाच्या वकिलांनी केला. तर तो व्हिप आपल्याला मिळालाच नसल्याने व्हिपचे उल्लंघन केलं नसल्याचं शिंदे गटाच्या वकिलांनी सांगितलं. आमदार अपात्रता प्रकरणात विधानसभा अध्यक्षांसमोर सुनावणी सुरु झाली आहे. या प्रकरणात शिवसेनेच्या आमदारांच्या एकूण 34 याचिकांचे सहा गटात वर्गीकरण करण्यात आलं आहे.
आज सुरू असलेल्या या सुनावणीला ठाकरे गटाचे अनिल देसाई, सुनिल प्रभू आणि अजय चौधरी सुनावणीला उपस्थित आहेत. तर शिंदे गटाचे कुणीही उपस्थित नव्हतं. त्यावेळी दोन्ही गटांमध्ये ई मेलवरच्या व्हिपवरून जोरदार युक्तिवाद झाल्याचं दिसून आलं. शिंदे गटाच्या 16 आमदारांना ई मेलच्या माध्यमातून व्हिप बजावण्यात आला होता असा दावा ठाकरे गटाने केला. त्या संबंधित त्यांनी पुरावेही सादर केले. पण ज्यावर व्हिप पाठवण्यात आले होते ते ई मेल आपले नसल्याचा दावा शिंदे गटाच्या वकिलांनी केला. आपल्याला व्हिपच मिळाला नाही, त्यामुळे त्याचं उल्लंघन केलं असं होत नाही असं शिंदे गटाच्या वतीनं सांगण्यात आलं