• विज्ञान आश्रम पाबळ व विद्यार्थी विकास योजना यांना प्रिसिजन सामाजिक पुरस्कार !
• जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ अभय बंग यांची प्रकट मुलाखत – ”सेवाग्राम ते शोधग्राम”,
• “बाईपण भारी देवा – पडद्यामागची कहाणी” अल्पावधीत बॉलिवूड सिनेमांना टक्कर देणाऱ्या सिनेमाची पडद्यामागची कहाणी.
• राजस्थानी पारंपरिक संगीताचा मागोवा घेणारा कार्यक्रम “पधारो म्हारे देस”…
सोलापूर- प्रिसिजन फाउंडेशनच्या वतीने येत्या ०३, ०४ आणि ०५ नोव्हेंबर २०२३ रोजी शिवछत्रपती रंगभवन येथे ”प्रिसिजन गप्पा’ आयोजिण्यात आल्या आहेत. सोलापूरकर रसिकांना दिवाळी आधीच सांस्कृतिक गप्पांची दिवाळी अनुभवता येणार आहे. प्रिसिजन गप्पांचे हे १५ वे वर्ष आहे. संगीत, नाटक, साहित्य, विविध कलांच्या आस्वादासोबतच सामाजिक जाणीव जागृत करणाऱ्या गप्पांनी सोलापूरचं सांस्कृतिक पर्यावरण समृद्ध केलं आहे. यावर्षीही दर्जेदार विषय, आगळे वेगळे व्यक्तिमत्वं आणि त्यांच्यासोबतच्या सकस गप्पा असा त्रिवेणी संगम घडणार आहे अशी माहिती प्रिसिजन फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. सुहासिनी शहा यांनी दिली त्यावेळी प्रिसिजन उद्योगसमूहाचे चेअरमन श्री.यतिन शहा हे उपस्थित होते.
रोजच्या धकाधकीच्या धावपळीमधून बाहेर पडून जगणं पुन्हा रंगतदार करण्यासाठी आणि रसिकांना एक सांस्कृतिक मेजवानी देण्यासाठी यावर्षीच्या प्रिसिजन गप्पा घेऊन येत आहोत. यंदाच्या प्रिसिजन गप्पांना शुक्रवार दि.०३ नोव्हेंबर २०२३ ’प्रिसिजन सामाजिक कृतज्ञता पुरस्काराने’ सुरवात होईल. या वर्षीचा ’प्रिसिजन सामाजिक कृतज्ञता पुरस्कार सेवा सहयोग फाउंडेशनच्या विद्यार्थी विकास योजना प्रकल्पाचे प्रमुख श्री रविंद्रजी कर्वे यांना देण्यात येणार आहे, सन्मानचिन्ह आणि रूपये तीन लाख असे या पुरस्काराचे स्वरूप आहे तर “स्व. सुभाष रावजी शहा स्मृती पुरस्कार” हा “विज्ञान आश्रम पाबळ जि पुणे या संस्थेला देण्यात येणार आहे. सन्मानचिन्ह आणि रूपये दोन लाख असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. संस्थेच्या वतीने डॉ योगेश कुलकर्णी हा पुरस्कार स्विकारतील. प्रख्यात सामाजिक कार्यकर्ते डॉ अभय बंग यांच्या हस्ते दोन्ही संस्थांना पुरस्कार प्रदान केले जातील. पुरस्कार सोहळ्यानंतर जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ अभय बंग यांची प्रकट मुलाखत होईल. मा विवेक सावंत आणि मुक्ता पुणतांबेकर हे दोन्ही मान्यवर डॉ अभय बंग यांची मुलाखत घेतील.


शनिवार दि.०४ नोव्हेंबर रोजी गप्पांच्या दुसऱ्या दिवशी एक अप्रतिम मेजवानी असणार आहे. समाजाला बाईपणाची नव्याने जाणीव करून देणारा आणि अल्पावधीत बॉलिवूड सिनेमांना टक्कर देणारा सिनेमा म्हणजे “बाईपण भारी देवा”. या चित्रपटातील कलाकार रोहिणी हट्टंगडी,. सुकन्या कुलकर्णी, शिल्पा नवलकर, चित्रपटाचे दिगदर्शक मा केदार शिंदे आणि निखिल साने यांच्या सोबतच्या दिलखुलास गप्पा आणि या चित्रपटाच्या पडद्यामागील कहाणी मुलाखतीच्या माध्यमातून सोलापूरकरांना ऐकायला मिळणार आहेत. प्रसिद्ध सूत्रसंचालक अभेनेत्री डॉ समीरा गुजर- जोशी यासर्वांची मुलाखत घेणार आहेत.
रविवार, दिनांक ०५ नोव्हेंबर रोजी राजस्थानी पारंपरिक संगीताचा मागोवा घेणारा कार्यक्रम “पधारो म्हारे देस”. हिंदी सिनेमातील अजरामर गाणी असोत अथवा भव्य दगडी महालातून घुमणारा बुलंद आवाज, राजस्थानी पारंपरिक संगीत कधीना कधी आपल्या कानावर पडले असणारच. हाच संगीताचा वारसा राजस्थानमधील पारंपरिक कलाकार शतकोनूशतके जपत आले आहेत. जैसलमेर येथील राजस्थानी कलाकार बादल खान, मुलतान खान. कुटाला खान आणि हाकिम खान या कलाकारांशी संवाद साधत जाणून घेणार आहोत त्यांचा प्रवास, त्यांची संगीत जतन करून घेण्याची धडपड याच सोबत ऐकायला मिळणार आहे ते त्यांचे कर्णमधुर पारंपरिक राजस्थानी संगीत. या कार्यक्रमाचे संवादक म्हणून कुलदीप कोठारी आणि मंदार करंजकर हे असतील.
प्रिसिजनच्या प्रथेप्रमाणे तीनही दिवस सायंकाळी ६.२५ वा. गप्पांना प्रारंभ होईल. नेहमीप्रमाणेच शिवछत्रपती रंगभवनमध्ये या गप्पा आयोजित केल्या आहेत. रंगभवनच्या प्रांगणातही आसनव्यवस्था व एलईडी प्रोजेक्टरद्वारे कार्यक्रम पाहण्याची सोय असेल. तसेच रसिकांच्या पार्किंगची व्यवस्था वोरोनोको शाळेच्या मैदानावर करण्यात आली आहे. रसिक सोलापूरकरांनी ’प्रिसिजन गप्पां’चा मनमुराद आनंद घ्यावा असे आवाहन डॉ. सुहासिनी व श्री. यतिन शहा यांनी केले.
पुरस्कारप्राप्त संस्थांचा परिचय-
1) सेवा सहयोग फाऊंडेशन संचलित विद्यार्थी विकास योजना:- गरीब कुटुंबात जन्म घेणे हा मुलाचा दोष नाही तर तो एक योगायोग असतो. पण गरीब कुटुंबात जन्मलेल्या बुद्धिमान मुलांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी त्यांना पाठबळ देण्यासाठी समाजाचा प्रयत्न असला पाहिजे, असा विचार घेऊन रवींद्र कर्वे यांनी विद्यार्थी विकास योजना सुरु केली. विद्यार्थी विकास योजने अंतर्गत परिस्थितीने गरीब, प्रतिकूल परिस्थितीतही पुढे जाण्याची इच्छा असते, शिक्षण घेऊन आपली स्वप्ने पूर्ण करण्याची धडपड असते अशा होतकरू व हुशार विद्यार्थ्याना उच्च शिक्षण घेण्यासाठी त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी शिष्यवृत्तीच्या माध्यमातून आर्थिक मदत केली जाते. पैशावाचून कोणाचेही शिक्षण अपूर्ण राहू नये हाच याचा उद्देश आहे. विद्यार्थी विकास योजना (VVY) ने २००८ मध्ये फक्त ५ विद्यार्थ्यांना मदत देऊन एक सुरुवात केली. TJSB सहकारी बँकेचे माजी सीईओ श्री. रवींद्र कर्वे यांनी काही मित्रांच्या आणि काही देणगीदारांच्या पाठिंब्याने सामाजिक बांधिलकी म्हणून याची सुरुवात झाली. तेव्हापासून देणगीदार, हितचिंतक आणि मार्गदर्शकांनी या उपक्रमाला आपला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे या प्रकल्पाचा विस्तार वाढत गेला आज पर्यंत महराष्ट्रातील ३२ जिल्ह्यातील १४६६ विद्यार्थ्याना १४.५८ कोटी रुपये एवढी रक्कम शैक्षणिक शुल्क देण्यात आले. या योजेनच्या मदतीमुळे १६ विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी परदेशातही शिक्षण घेत आहेत. याशिवाय, विद्यार्थी विकास योजनेने महाराष्ट्रातील दुर्गम ग्रामीण भागातील ०७ शाळांना त्यांच्या पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी ३.३१ कोटी रुपयांचे योगदान दिले आहे.
2) विज्ञान आश्रम पाबळ जि पुणे:- जेष्ठ शिक्षणतज्ज्ञ दिवंगत डॉ.एस.एस.कलबाग यांनी शिक्षणातील समस्यांवर उपाय शोधण्यासाठी १९८३ मध्ये विज्ञान आश्रमाची स्थापना केली. “विज्ञान” म्हणजे ‘सत्याचा शोध’ आणि “आश्रम” म्हणजे ‘ साधी राहणी आणि उच्च विचारसरणी, अशी संस्था जिथे सर्व समान आहेत, ही जुन्या गुरुकुल पद्धतीची आधुनिक आवृत्ती आहे’. येथे काम करत शिकता येते शिकत शिकत काम करता येते. वय वर्ष १५ ते ७५ या वयोगटातील कुणालाही इथे शिकता येते. ग्रामीण विकासासाठी तंत्रज्ञानाचा वापर करून उद्योजक घडविणे हा या आश्रमाचा मूळ हेतू आहे.
एका अर्थाने विज्ञान आश्रम ही एका संशोधकाने सुरू केलेली शिक्षणाची प्रयोगशाळा आहे. ग्रामीण भागातील तरूणांच्या बुध्दीमत्तेला विज्ञानाची जोड देत ग्रामीण भागाच्या विकासासाठी कार्य करण्यावर या आश्रमाचा भर असतो. निसर्ग हाच इथला अभ्यासक्रम आहे. यात गृह आरोग्य शेती पशूपालन अभियांत्रिकी आणि ऊर्जा पर्यावरण हे चार विषय मुलांना शिकवले जातात. गृह आरोग्यमध्ये अन्नप्रक्रिया आरोग्य तपासणी शिवणकाम वीणकाम तर शेती पशूपालनमध्ये शेतीचे तंत्र पशूपालन कुकुटपालन दुग्ध उत्पादन शिकवले जाते. अभियांत्रिकीमध्ये वर्कशॉप व फॅब्रिकेशन बांधकाम व सुतारकाम इलेक्ट्रिकल प्लंबिंग अपारंपारिक ऊर्जा स्त्रोतांचा अभ्यास यात शिकवला जातो. अमेरिकेतल्या एमआयटी ने विज्ञान आश्रमात उच्च तंत्रज्ञान असलेली फॅब लॅब सुरू केली. यंत्र बनवता यावेत यासाठीची ही यंत्रं आहेत. लोकांच्या हातात थेट तयार उपकरणं न देता ती तयार करण्याचं ज्ञान द्यावं हाच उद्देश यामागे आहे. हे नेहमीसारखं केवळ व्यवसायिक शिक्षण नव्हे तर यामागे चार मूलभूत तत्वे आहेत. एक हाताने काम करत शिकणं. दोन बहुविध कौशल्यं. तीन लोकोपयोगी सेवा आणि चार शिक्षक हाच उद्योजक या चार तत्वांवर इथलं शिक्षण चालतं.