प्रथम मी सुरक्षित … माझ्यामुळे इतर सुरक्षित…
सोलपूर दि. 21. प्रथम मी सुरक्षित… माझ्यामुळे इतर सुरक्षित… ही भावना ठेवून उद्या, रविवार दिनांक 22 मार्च रोजीचा जनता संचारबंदी यशस्वी करु, असे आवाहन जिल्ह्यातील सर्व प्रमुख अधिका-यांनी केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या जनता संचार बंदीच्या आवाहानाला सोलापूरच्या नागरिकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद देऊन कोरोनाला प्रतिबंध करावा, असे आवाहन संयुक्त प्रसिध्दी पत्रकाद्वारे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, महापालिका आयुक्त दीपक तावरे, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ, उपर पोलीस अधिक्षक अतुल झेंडे, पोलीस उपायुक्त वैशाली कडूकर यांनी केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी उद्या, रविवारी सकाळी 7 ते रात्री 9 या कालावधीत घराबाहेर न पडता जनता संचारबंदी पाळावी, असे आवाहन केले आहे. या पार्श्वभूमीवर वरील अधिका-यांनी सोलापूर जिल्ह्यातील नागरिकांना संचारबंदी पाळण्याचे आवाहन केले.
प्रसिध्दी पत्रकात नमूद केले आहे की, ‘कोरोना विषाणूचा संसर्ग कोणत्याही नागरिकांस होऊ नये यासाठी अत्यावश्यक यंत्रणा, आरोग्य, पोलीस, महापालिका, जिल्हा प्रशासन व प्रसार माध्यम यांचे प्रतिनिधी अहोरात्र काम करीत आहेत. त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सायंकाळी पाच वाजता सर्व नागरिकांनी आपल्या घराच्या खिडकी, गच्ची, दरवाजा किंवा छतावर येऊन पाच मिनटासाठी टाळया वाजवाव्यात’.
दरम्यान, कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी काल जिल्ह्यातील विविध प्रकारची दुकाने बंद ठेवण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. या आदेशांची आज पासून अंमलबजावणी सर्वत्र दिसून आली. प्रशासनाच्या आवाहानाला सकारात्मक प्रतिसाद देणा-या व्यापारी संघटना, चेंबर ऑफ कॉमर्स, व्यावसायिक संघटना यांचे जिल्हाधिकारी शंभरकर यांनी आभार मानले आहेत. 31 मार्च पर्यंत बंद ठेवून कोरोनाचा प्रसार रोखण्यात प्रशासनाला असेच सहकार्य करावे, अशी अपेक्षाही श्री. शंभरकर यांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, निवासी उपजिल्हाधिकारी अजित देशमुख यांनी जिल्ह्यातील सर्व आधार के्रद्र, महा-ईसेवा केंद्र, सीएससी आदी 31 मार्च 2020 पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जारी केले आहेत.