पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बिनडोक आणि पगला व्यक्ती आहेत. आता ‘इंडिया’ऐवजी भारत लिहिले जाणार. सगळी पुस्तकं बदलणार, त्यासाठी 40 हजार कोटींचा खर्च येणार आहे. पगला बाबा असतो तो चांगले कपडे काढतो आणि तसाच फिरतो. आपण म्हणतो जाऊ द्या तो पगला आहे, आहे तसा स्वीकारा. हा मोदी पण पगला आहे की नाही? अशा बोचऱ्या शब्दांत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर हल्लाबोल केला आहे. मोदींना जेवढे लवकर सत्तेवरून खाली खेचाल तेवढी देशाची तिजोरी वाचेल अशी टीकाही प्रकाश आंबेडकर यांनी केली.
वंचित बहुजन आघाडीच्यावतीने नाशिकमध्ये आदिवासी परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यावेळी बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान मोदी आणि भाजपवर टीका केली. प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले की, मणिपूरमध्ये झालेल्या हिंसाचाराच्या निषेधार्थ आदिवासींच्या मोर्चामुळे आदिवासींना आपल्या अधिकाराची, हक्काची जाणीव झाली. आता आपली जबाबदारी आहे की आपण सगळे एकत्र आले आहोत. भिल्ल, कोकणा, वंचित, एससी वेगळा लढणार नाही. एकत्र लढून देशाची सत्ता हातात घेऊ, असे आवाहन आंबेडकर यांनी केले. आदिवासींना धनगरांविरोधात आणि ओबीसींना मराठा विरोधात करायला सुरुवात झाली आहे. हे षडयंत्र केंद्रातील आणि राज्यांतील सरकार करत असून हे भाजप-राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार आहे विसरू नका, असेही आंबेडकर यांनी म्हटले. मार्च किंवा एप्रिल अगोदर लोकसभा निवडणुका होतील असा अंदाज त्यांनी वर्तवला. उद्या कोण निवडून येतील यापेक्षा मोदी, भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ येणार नाही ही खूणगाठ आपण बांधली पाहिजे असेही आंबेडकर यांनी म्हटले.