निर्भया बलात्कार प्रकरणातील सर्व आरोपींना आज शुक्रवारी पहाटे ५.३० वाजता फासावर लटकवण्यात आलं. मुकेश सिंग (वय-३२), पवन गुप्ता (वय-२५), विनय शर्मा (वय-२६) आणि अक्षय कुमार सिंग (वय-३१) अशी या आरोपींची नावं आहेत. निर्भया प्रकरणामुळे संपूर्ण देश हादरला होता. २०१२ मध्ये घडलेल्या प्रकरणानंतर संतापाची एक लाट देशभरात उसळली होती. तसंच अनेक अशी प्रकरणं बाहेर आली होती जी तोपर्यंत बाहेर येऊ शकली नाहीत. मुंबईतल्याही काही प्रकरणांना याच प्रकरणामुळे वाचा फुटली. निर्भयाला न्याय मिळावा यासाठी सगळ्या देशात एक आंदोलन उभं राहिलं होतं. ज्याची व्याप्ती दिल्लीत सर्वात मोठ्या प्रमाणावर होती. दरम्यान, दोषींच्या फाशीनं आपल्या मुलीच्या आत्म्याला शांती लाभेल अशी प्रतिक्रिया निर्भयाच्या आईनं व्यक्त केली होती.