डॉ. कलाम यांच्या जयंतीनिमित्त ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन
सोलापूर, दि. 17- आताचे विद्यार्थी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणात करीत आहेत. मोबाईल, लॅपटॉप टॅबद्वारे वाचन व अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या तुलनेने अधिक आहे. त्यामुळे आता यापुढील काळात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील ज्ञानस्त्रोत केंद्रात ई-बुक्स व ग्रंथांची संख्या वाढवणार असल्याची माहिती नूतन कुलगुरू प्रा. डॉ. प्रकाश महानवर यांनी दिली.
मंगळवारी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे ज्ञानस्रोत केंद्र यांच्याकडून माजी राष्ट्रपती तथा थोर शास्त्रज्ञ डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त आयोजित ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन कुलगुरू डॉ. महानवर यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषद सदस्य प्रा. देवानंद चिलवंत, प्रमुख वक्ते ज्येष्ठ पत्रकार रजनीश जोशी, डॉ. रूचा कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत ज्ञानस्रोत केंद्राचे प्रभारी संचालक प्रा. चंद्रकांत गार्डी यांनी केले.
कुलगुरू डॉ. महानवर म्हणाले की, विद्यापीठातील ज्ञानस्त्रोत केंद्र सुसज्ज असणे आवश्यक आहे. यापुढील काळात सदरील ज्ञानस्रोत केंद्र आधुनिक तंत्रज्ञानाने अधिक सुसज्ज व समृद्ध करण्यावर माझा भर राहील. विद्यार्थी व शिक्षकांनी अभ्यासाबरोबरच अवांतर वाचनाची सवय लावून यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करावे.अवांतर वाचनाने वक्तृत्व कौशल्य विकसित होण्याबरोबरच आपल्या ज्ञानात देखील भर पडते, असेही ते यावेळी म्हणाले. यावेळी जेष्ठ पत्रकार जोशी व डॉ. कांबळे यांनीही मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. तेजस्विनी कांबळे यांनी केले.