सोलापूर – सोलापूरची ग्रामदेवी म्हणून ख्याती असलेल्या श्री रुपाभवानी मंदिरात प्रतिवर्षाप्रमाणे 15 ते 28 ऑक्टोंबर रोजी विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती मंदिराचे ट्रस्टी, वहिवाटदार व पुजारी मल्लिनाथ (तम्मा) मसरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
15 ऑक्टोंबर रविवार, रोजी दु. 11.30 वाजता घटस्थापना करण्यात येणार असून दररोज श्री देवीची नित्योपचार पूजा व रात्री छबिना काढण्यात येणार आहे. 19 ऑक्टोंबर रोजी ललित पंचमी म्हणजेच नवरात्रीच्या पाचव्या दिवशी देवीची नित्योपचार पूजा व रात्री छबिना काढण्यात येणार आहे. संध्याकाळी 4.30 वाजता कुंकुमार्चनास प्रारंभ करण्यात येणार आहे.
22 ऑक्टोंबर रोजी दुर्गाष्टमी अलंकार महापूजा, दुपारी ३ वाजता होमास प्रारंभ, रात्री 8:०५ वाजता पूर्णाहुती त्याच मसरे यांच्या घरातून दहीहंडी मिरवणूक निघणार असून महापूजा करून रात्री छबिना मिरवणूक काढण्यात येणार आहे. 23 रोजी महानवमी, अलंकार पूजा व रात्री छबिना मिरवणूक काढण्यात येणार आहे.
24 रोजी विजयादशमी म्हणजेच दसरा सणादिवशी सकाळी अलंकार महापूजा होउन दुपारी चार वाजता श्री रुपाभवानी मातेचा पालखी सोहळा सीमोल्लघनासाठी मंदिरापासून वाजत-गाजत निघतो. पालखीतून श्री रुपाभवानी माता सीमोल्लंघनासाठी पार्क मैदानावरील शमीच्या वृक्षेला प्रदक्षिणा घालण्यात येते. या ठिकाकाणी सीमोल्लंघन पार पडल्यानंतर रात्री उशिरा पुन्हा पालखी सोहळा मंदिराकडे येतो. 28 ऑक्टोंबर शनिवार रोजी कोजागिरी पौर्णिमेनिमित्त श्री देवीची अलंकार पूजा व रात्री छबिना मिरवणूक काढून सर्वांना दुधप्रसाद देवून नवरात्रोत्सवाची सांगता करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
या पत्रकार परिषदेला सिद्धेश्वर बँकेचे चेअरमन प्रकाश वाले, मानकरी राजशेखर हिरेहब्बू, सुधीर थोबडे, सुनील मसरे, सोमनाथ मेंगाणे अनिल मसरे, बाळासाहेब मुस्तारे, सारंग मसरे, मनिष मसरे आदी उपस्थित होते.