लढाऊ यंत्रमाग कामगारांचा मेळावा संपन्न..…
सोलापूर – यंत्रमाग कामगारांना माथाडी धर्तीवर कल्याणकारी मंडळाची स्थापना करून कामगारांना लाभ मिळवून दिले पाहिजे.त्या अनुषंगाने कामगारांचे सामाजिक व आर्थिक स्थैर्य उंचावेल. याकरीता गेल्या चार दशकांपासून सीटू च्या माध्यमातून अविरत लढा चालू आहे.मात्र शासन ,प्रशासन आणि कारखानदार यांच्या वेळकाढू आणि उदासीन धोरणांमुळे कामगार न्यायापासून वंचित आहेत. रक्त सांडून मिळवलेल्या कामगार कायद्यांची वर्षानुवर्षे अमलबजावणी होत नाही.म्हणून 50 टक्के हंगामी पगारवाढ,15 टक्के बोनस, भविषयनिर्वाह निधी अन्य मागण्या घेऊन यंत्रमाग कामगारांचे 4 नोव्हेंबर पासून यंत्रमाग धारक संघ कार्यालय एम.आय. डी.सी.येथे आमरण उपोषण करणार असल्याची घोषणा ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉ. नरसय्या आडम मास्तर यांनी लढाऊ यंत्रमाग कामगारांच्या मेळाव्यात केली.

बुधवार दिनांक 11 ऑक्टोबर रोजी दत्त नगर येथे लाल बावटा यंत्रमाग कामगार युनियन च्या वतीने कॉ लक्ष्मण माळी बुवा जॉबर यांच्या अध्यक्षतेखाली लढाऊ यंत्रमाग कामगारांचा मेळावा पार पडला.
लालबावटा यंत्रमाग कामगार सिटू युनियनच्या वतीने कामगार नेते माजी आमदार कॉ. नरसय्या आडम (मास्तर) यांच्या नेतृत्वाखाली अनेकवेळा रस्त्यावर उतरुन मोर्चे, आंदोलने करून व प्रसंगी सभागृहात आवाज उठवून संघर्ष केल्यामुळे तत्कालीन राज्य सरकारने २९ जानेवारी २०१५ रोजी सुधारीत किमान वेतन रु. १०,१००/- जाहीर केले. सध्याचा चालू स्पेशल अलाऊन्स् रु. ५,५९७/- असे एकूण रु. • १५६९७/- ८ तासाला मासिक मजूरी मिळणे आवश्यक असतांना कामगारांना १२ तास राबूनही ते मिळत नाही. अशी टीका किशोर मेहता यांनी केली.
हाकेच्या अंतरावर दिवाळी सारखा मोठा सण आहे. आजच्या महागाईचा प्रचंड भडका उडालेला आहे. अशा या महागाईत कामगारांना हक्करजेपोटी १५% बोनस मिळाला पाहिजे अशी आपली सर्व कामगारांची मागणी आहे.

यंत्रमाग कामगारांना प्रा. फंड, ग्रॅज्युएटी, इ.एस.आय. इ. कामगार कायदे लागू झाले पाहिजेत म्हणून आपण निकराची लढाई लढलो. परिणामी १४ मे २०१९ रोजी मा. केंद्रीय औद्योगिक न्यायालयाने यंत्रमाग कामागारांना प्रा. फंड लागू केल्याचा ऐतिहासिक निकाल दिला.
मा. जावळे समितीने जाहीर केल्याप्रमाणे पिसरेटवर आधारीत किमान वेतनाची अंमलबजावणी करण्यास सरकार अक्षम्य दिरंगाई करत असल्याचे दिसते. यंत्रमाग कामगारांना कल्याणकारी मंडळ लागू करा म्हणून सरकारकडे आपला पाठपुरावा सुरु आहे. तत्कालीन आघाडी सरकारने १८ ऑगस्ट २०२१ रोजी मंत्रालयात बैठक घेऊन कल्याणकारी मंडळ लागू केल्याची घोषणा जाहीरपणे केली परंतू नवीन आलेल्या शिंदे-फडणवीस सरकारने कोणतेही प्रयत्न केलेले दिसत नाही.
या सर्व प्रश्नांवर आता लढाई तीव्र करण्यासाठी यंत्रमाग कामगारांनी आमरण उपोषणाचे हत्यार अंगीकारले असून याची गांभीर्याने शासनाला नोंद घ्यावेच लागेल.अशा इशारा ही यावेळी देण्यात आला.
या आहेत प्रमुख मागण्या.
१) यंत्रमाग कामगारांना दिवाळी बोनस १५% जाहीर करा.
२) मा. जावळे समितीने जाहीर केल्याप्रमाणे पिसरेटवर आधारीत सुधारीत किमान वेतनाची अंमलबाजवणी करा.
३) कल्याणकारी मंडळ स्थापन करा.
४)विज मंडळाचे खाजगीकरण हाणून पाडा.
रे नगर मधील कामगारांच्या घरांना रु. ५०० मध्ये विज कनेक्शन द्या.
५) प्रा. फंड, ग्रॅज्युएटी, इ.एस.आय. इत्यादी कामगार कायदे लागू करा.
यावेळी कॉ.व्यंकटेश कोंगारी व सिटू चे राज्य महासचिव ॲड.एम.एच.शेख यांनी मार्गदर्शन केले.
सदर मेळावा यशस्वी करण्यासाठी बाबू (मालू) कोकणे, किशोर मेहता, शहाबुद्दीन शेख, अरुण सामल, मोहन कोक्कुल मुरलीधर सुंचू, दिपक निकंबे, शरीफा शेख, शंकर गड्डम, लक्ष्मण माळी, विरेंद्र पद्मा, बाळकृष्ण मल्याळ, अंबादास जाधव, मनिषा लोखंडे, उमाकांत बलमेरी, मोहन दुडम, भारत साळुंके, रामकृष्ण गुंड, श्रीनिवास इंजामुरी, प्रशांत उंडाळे, नंदकुमार तेलंग, शाम आडम आदींनी परिश्रम घेतले.