मराठा आरक्षणासाठी उपोषणाच्या माध्यमातून राज्यात पुन्हा एकदा मराठा समाजात संजीवनी निर्माण करण्याचे काम मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे. दिनांक 14 ऑक्टोंबर रोजी अंतरवली सराटी या ठिकाणी त्यांची मोठी जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे त्या सभेसाठी सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील दोन युवक सायकल वरून जाहीर सभेत सहभागी होण्यासाठी निघालेले आहेत.
दरम्यान, 14 ऑक्टोंबर च्या अंतरवाली सराटी येथील त्यांच्या जाहीर सभेसाठी त्यांनी गावोगाव, जिल्हाभर मोठ्या प्रमाणावर वातावरण निर्मिती केली आहे. याच पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यातून शेकडो वाहनांमधून हजारो मराठा समाज बांधव जाहीर सभेसाठी जाणार आहेत.
मनोज जरांगे पाटील यांच्या 14 ऑक्टोबरच्या सभेसाठी प्रा.विनायक कलुबरमे व सिद्धेश्वर डोंगरे मंगळवेढा ते अंतरावाली-सराटी ३०० किमी सायकल प्रवास आज सकाळी सहा वाजल्यापासून सुरू केला आहे. ३ दिवसात प्रवास पूर्ण करणार आहेत.अशी माहिती सकल मराठा समाजाचे समन्वयक माऊली पवार यांनी दिली.
आज सकाळी 11 वाजता छत्रपती संभाजी राजे चौकात या दोन सायकल स्वारांचे स्वागत सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात येणार असून त्यांना पुष्पगुच्छ व मानाचा शेला देऊन त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे.