मुंबई : टोल दरवाढीवरुन मनसे आक्रमक झाली असून आता त्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे स्वतः मैदानात उतरले आहेत. राज ठाकरे येत्या चार दिवसांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असून हा प्रश्न त्यांच्यासमोर मांडणार आहेत. तसेच, गेल्या 4 दिवसांपासून टोल दरवाढीविरोधात उपोषण करणाऱ्या अविनाश जाधव यांना उपोषण मागे घेण्याच्या सूचनाही राज ठाकरेंनी दिल्या आहेत. राज ठाकरे आज स्वतः ठाण्यात अविनाश जाधव ज्या ठिकाणी उपोषणाला बसले होते, तिथे गेले आणि त्यांनी अविनाश जाधवांना उपोषण मागे घेण्यास सांगितलं. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले की, “ठाण्यातील टोलनाक्यावर जी दरवाढ झालीये, त्याविरोधात अविनाश जाधवसह काही इतर मंडळी उपोषणाला बसली होती. मी अविनाशला काल फोन करुन सांगितलं की, हे उपोषण वैगरे आपलं काही काम नाही. मी उद्या सकाळी येतो. तुम्हाला आठवत असेल तर मनसेनं टोलसंदर्भात अनेक आंदोलनं केली. राज्यभरातील अधिकृत आणि अनधिकृत 65 ते 67 टोलनाके आम्ही बंद केले. गेल्या निवडणुकांमध्ये शिवसेना आणि भाजपचा ज्यावेळी त्यांचा जाहीरनामा आलेला, त्यात त्यांनी जाहीर केलेलं आम्ही टोलमुक्त महाराष्ट्र करू. 2014 आणि 2019 लाही त्यांनी हेच सांगितलं होतं. पण त्यांना कधी कोणी विचारत नाही, मला मात्र प्रत्येकवेळी विचारलं जातं टोल आंदोलनाचं काय झालं?” तसेच, अविनाश जाधवांना आंदोलन मागे घेण्यासाठी सांगितल्याचंही राज ठाकरेंनी यावेळी बोलताना सांगितलं