चेन्नई : आज भारतीय क्रिकेट संघ विश्वचषकात पहिला सामना होणार आहे. कांगारुंविरुद्धच्या सामन्यानं टीम इंडिया विश्वचषकातील आपली मोहीम सुरू करणार आहे. टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामना 8 ऑक्टोबर रोजी चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर होणार आहे. हा ब्लॉकबस्टर सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 2 वाजता सुरू होईल.
टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया विश्वचषकाच्या मैदानात एकमेकांविरोधात उतरणार आहेत. आतापर्यंत एकदिवसीय विश्वचषकात ऑस्ट्रेलियाचा वरचष्मा राहिला आहे. ऑस्ट्रेलियानं विक्रमी पाच वेळा विश्वचषक जिंकला आहे, तर टीम इंडियानं दोनदा विश्वचषक पटकावला आहे. टीम इंडियाचे धुरंधर आपल्या खेळीनं सर्वांना चकीत करतातच, पण यामध्ये ऑस्ट्रेलियाचे शिलेदारही काही कमी नाहीत. त्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या संघातील काही खेळाडू टीम इंडियाचं टेन्शन नक्कीच वाढवू शकतात. तसं पाहिलं तर ऑस्ट्रेलियन संघात अशा खेळाडूंची फौज आहे, जी आजच्या सामन्यात टीम इंडियाचा ताण वाढवू शकतात. अशा परिस्थितीत टीम इंडियाला कांगारुंना काहीही करुन माघारी धाडावं लागेल., म्हणजेच, विकेट्स घ्यावे लागतील.