मुंबई : उद्धव ठाकरे यांनी भाजपसोबत सरकार स्थापन करण्यास नकार दिल्यानंतर तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू केली. त्यावेळी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांची आघाडी होण्याच्या हालचाली सुरू होत्या. त्यामुळे या राष्ट्रपती राजवटीमागची खेळी भाजपचीच असल्याचं बोललं जात होतं. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही अप्रत्यक्षपणे भाजपवर राष्ट्रपती राजवटीचं खापर फोडलं होतं. मात्र, या संपूर्ण प्रकरणावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धक्कादायक खुलासा केला आहे. फडणवीस यांच्या विधानाने एकच खळबळ उडाली आहे.
महाराष्ट्रात 2019मध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची आयडिया ही शरद पवार यांचीच होती. 2019मध्ये शिवसेनेने आम्हाला धोका दिला होता. त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी चर्चा सुरू केली होती. उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री व्हायचं असल्याचं लक्षात आलं. त्यानंतर राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी आमच्याकडे युतीचा प्रस्ताव ठेवला. आम्हाला तीन पक्षाचं सरकार नकोय. आम्ही तुमच्यासोबत येऊ शकतो, असा हा प्रस्ताव होता, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी हा गौप्यस्फोट केला.