येस न्युज नेटवर्क : आमदार अपात्रता प्रकरणी निर्णय कायद्याच्या चौकटीतच राहून घेतला जाईल. आपल्या निर्णय प्रक्रियेवर दबाव टाकण्याचा प्रयत्न कोणीही करु नये, असं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले. आदित्य ठाकरे यांनी विधानसभा अध्यक्षांच्या रद्द झालेल्या दौऱ्याबाबत एक ट्वीट केलेलं त्यासंदर्भातही राहुल नार्वेकरांनी भाष्य केलं आहे.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर बोलताना म्हणाले की, “अनेक माध्यमातून, अनेक लोकांकडून माझ्या निर्णय प्रक्रियेवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे. पण यापूर्वीही सांगितलं आहे की, मी माझा निर्णय संविधानातील तरतूदींच्या आधारावर घेणार आहे. कोणीही कितीही मला प्रभावित करण्याचा प्रयत्न केला. कोणत्याही प्रकारचे आरोप केले, तरीही मी त्यातून कोणत्याही प्रकारे प्रभावित होणार नाही. नियमानुसारच मी काम करणार.”
आदित्य ठाकरेंनी विधानसभा अध्यक्षांच्या रद्द झालेल्या परदेश दौऱ्याबाबत ट्वीट केलं होतं. त्यासंदर्भातही आज राहुल नार्वेकरांनी भाष्य केलं आहे. ते म्हणाले की, “माझा परदेश दौरा मी 26 सप्टेंबरलाच रद्द केलेला. माझ्या काही पूर्वनियोजित कार्यक्रमांमुळे मी त्या कॉन्फरन्ससाठी उपस्थित राहू शकणार नाही, असं 26 तारखेलाच CPA ला कळवलं होतं. पण 28 तारखेला उगाच त्या दौऱ्याबाबत मोठी चर्चा घडवून, त्यातून आपण हा दौरा रद्द करायला लावल्याचा केविलवाणा प्रकार काही नेत्यांनी केला. पण त्यांचा हा प्रयत्न आहे की, कसंही करुन अध्यक्षांवर दबाव आणायचा. पण अध्यक्ष त्यांच्या या गिधड धमक्यांना घाबरत नाही. त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा प्रभाव होत नाही, त्यामुळे नियमांनुसारच कामं होणार.”