तीन फुटावरील अनेक श्री गणेश मुर्तीचे तुळजापूर रोडवरील खाणीत विधिवत विसर्जन !
सोलापूर- सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त विविध उपाययोजना करण्यात आल्या असून सोलापूर शहरात विभागीय कार्यालय 1ते 8 यामध्ये एकूण 83 मूर्ती संकलन केंद्र करण्यात आले असून त्याद्वारे सोलापूर शहरातील गणेश मूर्ती संकलन करण्यात येत आहेत संकलन करण्यात आलेल्या गणेश मूर्तीचे विसर्जन सिद्धेश्वर तलाव येथील, गणपती घाट, विष्णू घाट, तुळजापूर रोडवरील खाणीत, रामलिंग नगर येथील विहीर , लक्ष्मी-विष्णू चाळीतील जुनी विहीर,अशोक चौक येथील मार्कंडे गार्डन येथील विहीर,आदी ठिकाणी सार्वजनिक व घरगुती गणेश मूर्तीच्या विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली आहे. आज तुळजापूर रोड येथील खाणीमध्ये श्री गणेश मूर्तीचे विधीवत विसर्जन करण्यात आले.
या ठिकाणी आज महापालिका आयुक्त शीतल तेली-उगले यांच्या हस्ते तुळजापूर रोड वरील खाण येथे सोलापूर शहरातील संकलन करण्यात आलेल्या श्रीगणेश मूर्तीचे पूजन करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते श्रीगणेशचे विसर्जन करण्यात आले. यावेळी अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे अतिरिक्त,आयुक्त निखिल मोरे , पोलिस उपआयुक्त विजय काबाडे , उपायुक्त मच्छिंद्र घोलप, नगर अभियंता लक्ष्मण चलवादी तसेच महापालिका अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
83 ठिकाणी मूर्ती संकलन केंद्र तर 12 क्रेन ची व्यवस्था आणि 86 गाड्यांची व्यवस्था करण्यात आले.
यावेळी सोलापूर शहरवासियांना आयुक्त यांनी आव्हान केले की सर्व नागरिकांनी गणेश मूर्ती महापालिकेच्या संकलन केंद्रावर ती गणेशमूर्ती सुपूर्त करावी आणि त्या सर्व मूर्ती महापालिकेच्या वतीने विसर्जन करण्यात येईल.सोलापूर शहरातील एकूण 83 ठिकाणी गणेश विसर्जन करण्यासाठी संकलन केंद्र उभारण्यात आले आहेत.त्याठिकाणी नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून सर्वप्रथम नागरिकांनी आपल्या घरातच गणेश विसर्जन करावं अथवा आपल्याला शक्य नसल्यास त्यांनी जवळच्या महापालिकेच्या संकलन केंद्रामध्ये गणेश मूर्ती सुपुर्द करावे ती विधिवत पूजा करून महापालिकेच्यावतीने विसर्जन करण्यात येईल तसेच नागरिकांनी घरीच राहून सुरक्षित राहावे आणि पर्यावरण पूरक श्रीगणेश विसर्जन करावे सर्व सोलापूकरानी महानगरपालिकेला सहकार्य करावे असे आवाहन आयुक्त शीतल तेली- उगले यांनी केले.