सोलापूर विद्यापीठात प्रजासत्ताक पथसंंचालन निवड चाचणी शिबिरास प्रारंभ
सोलापूर, दि.27- भारताला विश्वगुरु बनवण्यासाठी युवकांसह प्रत्येकाची भूमिका महत्त्वाची असल्याचे प्रतिपादन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. राजनीश कामत यांनी केले. त्यासाठी सर्व दृष्टीने सक्षम युवापिढी तयार होणे तितकेच आवश्यक असल्याचे मत ही त्यांनी यावेळी व्यक्त केले.
बुधवारी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या मुख्य सभागृहात राष्ट्रीय सेवा योजना क्षेत्रीय कार्यालय पुणे, युवा कार्य व क्रीडा मंत्रालय भारत सरकार आणि उच्च व तंत्र शिक्षण विभाग, महाराष्ट्र शासन यांच्यातर्फे आयोजित तीन दिवसीय राज्य व राष्ट्रीय प्रजासत्ताक दिन पूर्व पथसंचलन राज्यस्तरीय निवड चाचणी शिबिराचे उद्घाटन प्रभारी कुलगुरू डॉ. रजनीश कामत यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. गौतम कांबळे, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे क्षेत्रीय संचालक श्री अजय शिंदे, राज्य संपर्क अधिकारी डॉ. रामेश्वर कोठावळे, कुलसचिव योगिनी घारे, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्रा. देवानंद चिलवंत, राजाभाऊ सरवदे, प्रा. सचिन गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत एनएसएस विभागाचे संचालक डॉ. राजेंद्र वडजे यांनी केले.
प्रभारी कुलगुरू डॉ. कामत म्हणाले की, चैतन्याचा झरा असलेल्या तरुणाईमध्ये कायमच एक ऊर्जा असते. अशा या ऊर्जादायी तरुणाईच्या परेड प्रॅक्टिसमुळे राष्ट्र प्रेमाची भावना आपसुकच जागृत झाली. राष्ट्रीय सेवा योजनेचे ‘नॉट मी बट यू’ हे घोषवाक्य समाज व राष्ट्र उभारणीत नेहमीच योगदान देत राहिले आहे. शिक्षण, साक्षर, आरोग्य, पोषण, कुटुंबकल्याण, पर्यावरण आपत्ती निवारण आदी क्षेत्रात राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक कायम योगदान देत आहेत. जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शकानुसार शारीरिक रोगमुक्त असणे बरोबरच सामाजिक व मानसिक आरोग्य देखील तंदुरुस्त राहणे महत्त्वाचे असल्याचेही ते यावेळी म्हणाले.
श्री अजय शिंदे म्हणाले, राष्ट्रीय सेवा योजना विभागाकडून विविध उपक्रम राबविले जातात. त्यात प्रजासत्ताक पथसंंचालन हा सर्वात महत्वाचा कार्यक्रम आहे. राज्यातील सुमारे 5 लाख स्वयंसेवकामधून निवड चाचणी शिबिरासाठी 333 विद्यार्थ्यांची निवड झाली. यातील आता दिल्लीतील राष्ट्रीय संचालनासाठी 74 विद्यार्थ्यांची तर मुंबईतील राज्यस्तरीय प्रजासत्ताक संचालनासाठी 50 विद्यार्थ्यांची निवड होणार आहे. एनएसएसचे विद्यार्थी असूनही उत्कृष्टरित्या परेडचे सादरीकरण करत असतात. चाचणी शिबिरात सहभागी स्वयंसेवकांनी उत्कृष्टरित्या योगदान द्यावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
डॉ. रामेश्वर कोठावळे यांनी यंदा दिल्लीत राष्ट्रीय प्रजासत्ताक संचालनासाठी केवळ मुलींची टीम असणार असल्याचे सांगितले. राष्ट्रीय सेवा योजनेमुळे नेतृत्वगुण विकास होण्याबरोबरच सर्वांगीण व्यक्तिमत्व विकास घडतो, असे त्यांनी सांगितले. या बरोबरच त्यांनी मेरी माटी मेरा देश उपक्रम, युथ पोर्टलची माहिती सांगत त्यांनी काम आणि कर्तुत्वाने विद्यार्थ्यांना मोठे होण्याचे आवाहन केले. मोबाईलचा अतिवापर टाळावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. यावेळी परीक्षक म्हणून आलेले डॉ. सुशील शिंदे, डॉ. रमेश देवकर, प्रा. शिल्पा लब्बा, डॉ. भीमाशंकर व्हनमाने यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. तेजस्विनी कांबळे आणि प्रा. श्रुती देवळे यांनी केले तर आभार डॉ. जवाहर मोरे यांनी मानले.