दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी अभियानात १२ हजार दिव्यांगांची उपस्थिती. प्रत्येक दिव्यांगा पर्यंत खुद्द बच्चूभाऊ पोहोचले, अपुलकीने विचारपूस अन् कार्यवाहीसाठी जागेवरुन आदेश
सोलापूर :- देशातच नाही तर जगात दिव्यांगांसाठी स्वतंत्र मंत्रालयाची निर्मिती करणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य असून गेली वीस वर्षांपासून सुरु असलेल्या लढ्याला हे यश आले असून राजकारण म्हणून नव्हे तर मी दिव्यांगांच्या सेवेच व्रत स्विकारले आहे, असे भावनिक उद्गार राज्याचे दिव्यांग कल्याण मंत्रालय दिव्यांगांच्या दारी, या अभियानाचे अध्यक्ष ना.ओमप्रकाश ऊर्फ बच्चूभाऊ कडू यांनी येथे काढले.
दिव्यांग कल्याण मंत्रालय दिव्यांगांच्या दारी या राज्य शासनाच्या वतीने सुरु असलेल्या अभियानाचा सोलापूर जिल्ह्याचा कार्यक्रम सोलापुरातील सिद्धेश्वर साखर कारखाना येथील कर्मयोगी आप्पासाहेब काडादी सांस्कृतिक भवनमध्ये बुधवारी घेण्यात आला. या कार्यक्रमाचे उद्घाटन ना.कडू यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. माजी सहकारमंत्री आ.सुभाष देशमुख, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहीनकर, सोलापूर महानगर पालिकेचे अतिरिक्त आयुक्त निखील मोरे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी सुनील खमितकर, महानगरपालिकेतील कामगार कल्याण व जनसंपर्क अधिकारी विठ्ठल कस्तुरे, दिव्यांग कल्याण विभागाचे वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता सच्चिदानंद बांगर प्रहारच्या महिला जिल्हाध्यक्षा संजिवनी बारंगुळे, विजय पुरी, दत्ता चौगुले, नितीन माने, जमीर शेख यांच्यासह प्रहारचे पदाधिकारी उपस्थित होते. या अभियानासाठी सोलापूर शहर व जिल्ह्यातून सुमारे बारा हजार दिव्यांग बांधव व त्यांचे नातेवाईक आले होते.
माझा हा संवाद लुबाडण्यासाठी नाही तर ज्यांचा कोणी वालीच नाही, त्यांची विचारपूस करुन त्यांचे दुःख कमी करण्यासाठी असल्याची भावनिक साद घालून ना. बच्चूभाऊ म्हणाले, सकारात्मक भूमिका ठेवा.मी दिव्यांगांसाठी आयुष्यभर लढण्याचा निर्धार केला आहे. ५ टक्के दिव्यांग कल्याण निधी थेट दिव्यांगांच्या खात्यावर जमा करण्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे. या अभियानामुळे प्रशासन कामाला लागले असून सोलापूर जिल्ह्यातील अभियानाला झालेली गर्दी पाहता जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद व सोलापूर महानगरपालिका यांनी समन्मवयातून काम केल्याचे स्पष्ट झाले आहे. यानिमित्ताने प्रशासनही कामाला लागले आहे. आ.देशमुख म्हणाले, राज्यातील दिव्यांगांची प्रामाणिकपणे कामे करणारा नेता म्हणून ना.बच्चूभाऊ यांची ख्याती असून सरकारला भांडून त्यांनी दिव्यांगांना न्याय मिळवून दिला आहे. गरीब निराधारांना लोकमंगलच्या वतीने दोनवेळचे मोफत जेवण देण्यात येते. ज्या दिव्यांगांना स्वयंपाक करता येत नाही, त्यांनाही घरपोच दोनवेळचे जेवण देऊ. सोलापूर पंढरपूर शहरात ही सेवा देण्याचा मानस आहे.
दिव्यांगांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रशासन कटिबद्द असल्याचे जिल्हाधिकारी आशीर्वाद म्हणाले. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जास्तीत जास्त दिव्यांगाना योजनांचा लाभ कसा मिळेल, यासाठी काटेकोरपणे नियोजन केले जाईल, असे मुख्य कार्यकारी अधिकारी आव्हाळे म्हणाल्या.जिल्हा समाज कल्याण अधिकारी खमितकर म्हणाले, २०११ व २०१८ साली सोलापूर जिल्हा परिषदेने प्रत्येक तालुक्यात दिव्यांगांचे मेळावे घेऊन त्यांच्या अडचणी सोडविण्याचा प्रयत्न केला आहे. ना.बच्चूभाऊ यांच्यामुळे राज्यातील दिव्यांगांना न्याय मिळाला आहे.
यावेळी जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाने काढलेल्या दिव्यांग व्यक्तींसाठीच्या योजना, उपक्रम, कायदे, पुनर्वसन याची माहिती असलेल्या माहिती पुस्तिकेचे ना.बच्चूभाऊ यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. यावेळी भारतीय क्रिकेट अंध क्रिकेट संघातील सोलापुरातील खेळाडू गंगा कदम हिला महानगरपालिकेच्या वतीने ५० हजार रुपयांचा धनादेश देऊन तिचा गौरव केला. यावेळी अस्थिव्यंग क्रिकेटपटू मनोज धोत्रे, अस्थिव्यंग गिर्यारोहक सोमनाथ घुले, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त अस्थिव्यंग खेळाडू अकुताई भगत, लेखिका छाया उंब्रजकर, उत्कृष्ट अस्थिव्यंग वेल्डर दस्तगीर शेख, चित्रकार लक्ष्मी शिंदे, उत्कृष्ट गायक शिवशरण गडतुरे, अंध असूनही समाजसेवा करणारे प्रभाकर कदम, मनीष उपाध्ये, संतोष भंडारी यांचा यावेळी सन्मान करण्यात आला. जिल्हा समाज कल्याण अधिकारी सुनिल खमितकर यांनी प्रास्तविक केले. श्वेता हुल्ले यांनी सूत्रसंचालन केले. सच्चिदानंद बांगर यांनी आभार मानले.
सुमारे बारा हजाराहून अधिक दिव्यांग लाभार्थी व त्यांच्या पालकांची उपस्थिती ना.बच्चूभाऊ कडू यांच्या जोशपूर्ण व भावनिक भाषणामुळे सारे वातावरण भारावून गेले होते. उद्घाटनानंतर लगेच लाल दिव्याच्या गाडीत बसून न जाता सुमारे दोन तास प्रत्येक दिव्यांगाची विचारपूस करुन प्रशासनाला सूचना देण्याचे काम ना.बच्चूभाऊ यांनी केले. महानगरपालिकेच्या वतीने दिव्यांगांना कार्यक्रमस्थळी येण्यासाठी व जाण्यासाठी मोफत बसची व्यवस्था केली होती. जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी व नगरपरिषदांनी ५ टक्के निधीतून दिव्यांगांसाठी वाहन भाडे देऊन दिव्यांगांची सोय केली होती.