सोलापूर, (प्रतिनिधी):- बनावट जात प्रमाणपत्र सादर केल्याप्रकरणी सोलापूरचे खासदार जयसिध्देश्वर महास्वामी यांच्या विरूध्द पोलीसांनी गुन्हा दाखल करून तपास करावा आणि त्याचा अहवाल न्यायालयात सादर करण्यात यावा असा आदेश मुख्य न्यायदंडाधिकारी के.पी. जैन यांनी दिला.
बेडा जंगम जात प्रमाणपत्र खोटा असल्याचे सिध्द झाल्यानंतर जात पडताळणी समिती सोलापूर यांनी अक्कलकोट तहसिलदारांना सोलापूरचे खासदार जयसिध्देश्वर महास्वामी यांच्या विरूध्द न्यायालयात गुन्हा दाखल करण्याचा निकाल दिला होता. त्यानुसार तहसिलदारांनी सोलापूरच्या मुख्य न्यायदंडाधिकाऱ्याकडे खासदाराविरूध्द गुन्हा दाखल करावा अशी फिर्याद दिली होती त्यावर सुनावणी दि. 4 मार्च रोजी झाली त्यामध्ये खासदार महास्वामी यांचा जात प्रमाणपत्र बनावट असल्याचे जात पडताळणी समितीने निकाल दिल्याने पोलीसांनी तातडीने गुन्हा दाखल करून तपास करावा आणि त्याचा अहवाल न्यायालयात सादर करावा असा आदेश मुख्य न्यायदंडाधिकारी जैन यांनी दिला. त्यावरून सोलापूरचे खासदार महास्वामी यांच्या अडचणीमध्ये वाढ झाली आहे.