बरेच दिवस कामाचा ताण सहन केला होता , वर्षभर इलेक्शन व कार्यालय चे काम यातून मनाला विरंगुळा हवा होता. आणि तो एखादी स्पोर्टस ऍक्टिव्हिटी केल्याशिवाय जाणार नव्हता….कामाच्या धकाधकीत बरेच दिवस ट्रेकिंग पण झाले नव्हते. आजपर्यंत आमच्या अधिका-याच्या ग्रुपने महाराष्ट्रातील किमान दीडशे च्या आसपास किल्ले फिरलो असेन, सह्याद्रीच्या कड्याकपा-या ऊन,वारे,पाऊस,थंडी,गारठा कशाचाही विचार न करता वनवन फिरलो. अगदी नेपाळ मध्ये एव्हरेस्ट चा बेस कॅम्प तर कधी लडाख मधील स्टोक कांग्री चे शिखर,व जगातील सर्वात उंच व कठीण रोड वर मोटार बाईक करणे लडाख मधील रक्त गोठवणाऱ्या पाण्यात रिव्हर राफ्टिंग , पॅरा ग्लायडिंग , पॅरा सिलिंग , स्कुबा डायव्हिंग तर सलग तीन तीन दिवस व रात्री बेरात्री गड चढताना उतरताना अंधाराची, प्राण्यांची कशाचीही तमा बाळगली नाही. गळ्याएवढ्या गवतातून वाट काढताना कितीतरी साप पायाला स्पर्श करून गेले असतील. पण त्याची कधी भीती वाटली नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वरचे प्रेम आणि मित्रांचा सहवास आणि धाडस यासाठी हा अट्टाहास असायचा…
काही दिवसांपासून ग्रुपमधील कोणाच्या तरी डोक्यात आले.. ट्रेकिंग तर नेहमीच करतो.यावेळी आपण स्कायडायविंग आणि बंजी जम्पिंग करू मग शोधाशोध सुरू झाला. कुठून करायचे, कधी करायचे..? भारतात तर स्काय डायव्हिंग सारखे इव्हेंट नाहीत , मग बाहेर देशातील स्काय डायव्हिंग घेणाऱ्या ठिकाणाचा शोध घेतला , प्लॅन कला, रजा पण मंजुर झाली. सोबत सर्वच कर्तबगार व धाडसी मित्र इस्लामपूर चे डँशिग डीवायएसपी कृष्णात पिंगळे, कराडचे जिगरबाज डीवायएसपी सुरज गुरव,आमच्या सर्वांचे लाडके दादा अमोल गुरव व मी व मी स्वतः धनराज पांडेसहाय्यक संचालक,स्थानिक निधी लेखा कार्यालय,वित्त विभाग , सोलापूर असे पाच जणांनी जायचे ठरवले…
जाण्याचा दिवस, भेटीची वेळ, ठिकाण ठरले ते खालापूर!! भारताबाहेर जाण्यापूर्वी व बाहेर जाऊन ॲडव्हेंचरस ऍक्टिव्हिटी करण्यापूर्वी इमॅजिका येथील सर्व राईड डोळे सताड उघडे ठेऊन करायचे ठरवले , इमॅजिका मधील सर्व राईड म्हणजे आम्ही पुढे करनार असलेल्या सर्व राईड ची पूर्व परीक्षाच!
थायलंड मध्ये तेरा हजार फुटावरून विमानातून उडी (स्काय डायव्हिंग) मारायची ठरवलं.. धाक- दूख आणि भीती तर होतीच.. पण ज्या गोष्टीची भीती वाटते तीच गोष्ट जाणीवपूर्वक करायची. हे पहिल्यापासून ग्रुपचे टार्गेट असल्यामुळे सर्वानी करायचे हे मनोमन ठरवले होते. विमानातून उडी मारत असताना पृथ्वीचा आकार गोल आहे , हे पुस्तकात वाचलेलं वाक्य तेरा हजार फुटावरून सर्वांना स्पष्ट दिसत होतं. उडी मारायची म्हणून जेव्हा विमानाच्या दारात उभा राहीलो.. तेव्हाचा तो उंचीवरचा वारा,थंडगार हवा ज्या वेगाने तेरा हजार फूट वरून खाली येत होतो त्यात गाल फाडुन टाकते की काय असा वाऱ्याचा प्रचंड वेग …. तेरा हजार फुटावरुन विमानातून जमीनेकडे धावताना मात्र माणूस कितीही वर गेला तर पाय जमिनीवरच ठेवावे लागतात, नाही तर निसर्गात ती ताकद प्रचंड आहे जी त्याला जमिनीवर घेऊन येते हे जाणवले.
दुसऱ्या दिवशीच्या इवेंट बंजी जम्पिंग होता तब्बल तीनशे फूट उंचीवरून खाली उडी मारताना कसे होईल या विचारातच संपूर्ण रात्र विचारात गेली , वरून उडी घ्यायच्या विचारानेच हृदय दुखल्या सारखे वाटायचे, तीनशे फूट उंचीवर तेव्हा उडी मारण्यासाठी गेलो होतो तेव्हा खाली असलेले पाणी न दिसता गोल पृथ्वी व पायात बांधलेली दोरी , व खालून जोरात ओरडून भीती घालणारे मित्रा फक्त याच गोष्टी दिसत होत्या पण दोस्तासमोर सर्वानाच उडी मारण्याचे शिवाय पर्याय नव्हता, तेथुन माघार घेणे शक्य नव्हते.. आमच्यातील प्रत्येकजण थोडेसे घाबरत पण बिनधास्तपणे वरून उडी घेतली ते क्षण कॅमेरात साठवलं , स्काय डायव्हिंग पेक्षा खतरनाक हा प्रकार आताही विडिओ पाहताना अंगावर काटा येतो, पण उडी मारून खाली आल्यानंतर certificate of courage घेताना छाती अभिमानाने फुलून येते..
त्याच देशातील टायगर झु पार्क , प्रत्यक्षातील जंगल सफारी ज्यात आतापर्यंत वाचलेले सर्व जंगली प्राणी अगदी मुक्त वावरत आहेत, डॉल्फिन शो, एलिफंट शो, क्रोकोडाईल शो, बर्ड शो हे पाहताना मानवाच्या प्राणी शिक्षणावरील करामती पहायला मिळाल्या ज्या अफलातून होत्या.
याच देशातील मिनी सियाम हे स्थळ पाहताना जगातील सर्व महत्वपूर्ण स्थळ व सर्व आश्चर्य याची अगदी हुबेहूब पण लहान प्रतिकृती पाहताना माझे डोळे ताजमहाल कोठे दिसतो का? ते शोधत होते , पण तेवढ्यात मध्यभागी ताजमहल चा फक्त बॅनर दिसला व हसू आले की याना याची प्रतिकृतीपण जमली नसणार!
” Believe or not ” हे स्थळ तर प्रत्येकाच्या सर्व प्रकारच्या भावना जागृत करण्याचे ठिकाण ठरले कधी अत्यन्त भीती, कधी विस्मय तर कधी हास्य..! तेथील स्ट्रीट फ्रुट खाताना घेतलेला आनंद ही नक्कीच अविस्मरणीय! देशातील रस्ते, यांत्रिक टोलनाके , स्वच्छता पाहताना आपण खूप मागे आहोत हे प्रकर्षाने जाणवत होते , यावर लिहायचे तर आणखी कित्येक पाने लागतील..।
थायलँड सोडून आम्ही पुढील प्रवासासाठी निघालो , कंबोडिया येथील सीएम रीप या एअरपोर्टवर उतरल्या नंतर एअरपोर्ट मधील स्थापत्यकला चे प्रतिकृती पाहून कंबोडिया या देशातील स्थापत्यकलेची महत्त्व लगेच जाणवते . भारताबाहेर हिमालय पर्वत व गंगा नदी हे नाव कुठे ऐकायचा असेल तर ते कंबोडिया देशात ऐकायला मिळते. इसवी सनाच्या नवव्या शतकामध्ये राजा जयवर्मन दुसरा यांनी हिंदू धर्माचा प्रचार व प्रसार करीत मंदिर बांधकाम व स्थापत्यकलेचा विकास यात भरीव कामगिरी केली. आज आपल्या देशात जगातील सर्वात जास्त हिंदू लोक राहत असले तरी, जगातील सर्वात मोठे हिंदू चे मंदिर कंबोडिया मध्ये आहे. हिंदू संस्कृतीचा इतिहास भगवद्गीता, महाभारत, रामायण, यातील कथानके याचे कोरीव काम कंबोडिया येथील मंदिराच्या नक्षी कामात पाहायला मिळते. प्रचंड शिवालय, विष्णूचे मंदिर व ब्रह्मदेव यांची प्रचंड मंदिरे कंबोडियात पाहायला मिळतात. जवळपास वीस किलोमीटर अंतर पायी चालत आम्ही एकच मंदिर पाहत होतो. मंदिराच्या चबूतरा पासून शिखरापर्यंत प्रत्येक दगडावर बारीक कलाकुसर व नक्षीकाम, तर मंदिराच्या डाव्या व उजव्या बाजूला समान कलाकृती सभामंडप , गाबाग्रह पहायला मिळत होती . रामायणातील दृश्य सीतेची अग्निपरीक्षा, रावण दहन अशा अनेक कलाकुसर तेथील अंकोरवाट मंदिरात पाहायला मिळत होत्या कंबोडिया देशातील वेगवेगळ्या तीन ठिकाणी असलेली जुनी स्थापत्यकला दोन दिसतात पाहून मन अचंबित होऊन जाते व गर्व वाटतो तो हिंदू धर्माचा!! ज्याचा प्रचार आणि प्रसार कंबोडिया पर्यंत झाला होता. येथील प्लॅन झाल्यानंतर पुढील सतत सहा तासाचा प्रवास करत आम्ही सर्वजण इंडोनेशियाला पोहोचलो. इंडोनेशियातील कुटा या बेटावर आम्ही मुक्कामास होतो अतिशय सुंदर असलेल्या या देशात रस्ते रुंदी खूप लहान असल्याने ट्रॅफिकचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे . तरीही येथील लोक अत्यंत प्रामाणिकपणे ट्रॅफिकचे नियम पाळताना दिसून आले. एकही व्यक्ती विना हेल्मेट ची दुचाकी चालवताना दिसून आलेले नाही . ट्रॅफिकचा अडथळा पार करत इंडोनेशियातील किंटामनी वोल्कॅनो हा ट्रेक पार पडला. वाटेत जाताना जगातील सर्वात महागडी अशी लुवाक कॉफी तसेच इतर बारा ते पंधरा प्रकारचे कॉफीची चव कॉफी फार्म येथे घेतली. दुसऱ्या दिवशी बाली येथील स्वर्गाचे दार heaven’s गेट पाहण्यासाठी आम्ही सर्वजण गेलो हेवन्स गेट हे स्थळ पाहिल्यानंतर खरोखर स्वर्गाची अनुभूती येते की एवढे सुंदर ठिकाण आपल्या पृथ्वीतलावर आहे.
तिसरा दिवस हा ॲडव्हेंचरस ऍक्टिव्हिटी चा होता. सकाळच्या सत्रात दहा किलोमीटरवर रिव्हर राफ्टींग तर दुपारी सुमारे दोन तास कॉड बाईक हा आनंद तर अवर्णनीय होता नद्या-नाले, डोंगर -टेकडी , दरी, शेत, चिखल -पाणी यातून बाईक चालवताना अंगाचा थरकाप उडत होता पण येणारे थ्रील मात्र अद्वितीय होते. त्यानंतर हॉट एअर बलून मध्ये बसून सुंदरशा निसर्गाचा ड्रोन व्हिडिओ बनवताना मनाला मिळत असलेला आनंद हा अत्यंत सुखावणारा होता. लाकडी कलाकुसर व कोरीव कामात अग्रेसर असलेल्या बालीतून लाकडी वस्तू खरेदी करण्याचा मोह आवरला तर नवलच ! मन भरेल अशी खरेदी झाली.
शेवटचा दिवस तर फुल्ल धमाल व मस्ती चा होता, बाली तील अत्याधुनिक वॉटर स्पोर्टस मध्ये प्रत्येक थरकाप उडावणारी राईड आम्ही केली , मुख्यत्वे कॅप्सूल राईड व पायथॉन राईड चा प्रकार म्हणजे डर के आगे जित है! खरे तर रोजचे जीवन म्हणजे सुद्धा एक आव्हान बनले आहे, कोण आज आहे , उद्या नाही . पण उद्याची सोय करण्यात आज चे वर्तमान हरवणे , असे जगणे मात्र व्यर्थ ठरते. . मित्रांसोबत घालवलेले 12 दिवस म्हणजे 12 वर्ष वाढलेले आयुष्य, प्रतेक क्षणाला आपल्यातील तणाव कमी होत जाऊन काहीतरी धाडसी करायचे जे ठरवले, ते संपन्न झाले होते. जीवन खऱ्या अर्थाने जगण्याचा एक वेगळा मंत्र ही, आम्हाला या ट्रिप मध्ये सापडला होता.. आपला इतिहास जगणं , पाहणं व समजून घेणं, आपल्या देशाच्या इतर देशातील पाऊलखुणा समजून घेऊन आपल्या गौरवशाली इतिहासाचा प्रत्यय स्वतः अनुभवणे व त्याच सोबत दुसऱ्या बाजूला धाडसी प्रकारात सहभागी होऊन मनातील संपूर्ण भीती घालवणं , यात खूप आनंद आहे.
खऱ्या अर्थानं सार्थ ठरवणारं ते मंत्र आम्हला कळलं ते म्हणजे, *जिंदगी ना मिलेगी दुबारा.