उजनी धरणात झाला 63.69 टीएमसी एवढा पाणीसाठा…
उजनी धरणाच्या पाणी साठ्याकडे अख्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. हा महाराष्ट्रातील एक महाकाय प्रकल्पातून ज्याची पाणी साठवण क्षमता तब्बल 123 टीएमसी एवढी आहे. सोलापूर, पुणे आणि नगर या तीन जिल्ह्याला या धरणाचा विशेष फायदा होतो. नोव्हेंबर -डिसेंबर 2022 पर्यंत 111 टक्के म्हणजेच 123 टीएमसी एवढा पाणीसाठा असलेल्या उजनी धरणाच्या पाण्याचे योग्य नियोजन नसल्यामुळे 3 जुलै 2023 रोजी या धरणातील पाणीसाठा तब्बल वजा 36 टक्क्यावर इतका खाली आला. 3 जुलै ते 31 जुलै पर्यंत हे धरण 36 टक्के भरले असून 19 टीएमसी एवढा पाणीसाठा वाढला आहे. मंगळवारी सकाळी सहाच्या अपडेट नुसार उजनी धरण वजा मधून प्लस मध्ये आले आहे हे विशेष.
सध्या धरणात 63 टीएमसी एवढा पाणीसाठा झाला असून धरण 100% म्हणजे 118 टीएमसी भरण्यासाठी आणखी 55 टीएमसी इतक्या पाण्याची गरज आहे. दौंड मधून सध्या 12,255 क्युसेक वेगाने पाणी येत आहे. उजनी धरणाच्या वरील वीस धरणांपैकी तेरा धरणे 70% पेक्षा जास्त भरली आहेत. जुलै महिन्याप्रमाणेच ऑगस्ट महिन्यात उजनीच्या कॅचमेंट एरियामध्ये तसेच भीमा खोऱ्या दमदार पाऊस झाला तरच उजनी धरण 100% भरेल. त्यातच ऑगस्ट महिन्यात कमी पाऊस असल्याचा हवामान खात्याचा अंदाज असल्यामुळे हे धरण भरेल का याची चिंता सर्वांनाच सतावत आहे.