सोलापूर, दि. १२- पिक कर्जाच्या वितरणासाठी खास मेळावे आयोजित करा, अशा सूचना जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी येथे दिल्या.
जिल्हाधिकारी शंभरकर यांनी जिल्हास्तरीय बैंक समितीची आज बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी या सूचना दिल्या. बैठकीस नाबार्डचे जिल्हा व्यवस्थापक प्रदीप झिले, अग्रणी बँक व्यवस्थापक संतोष सोनवणे, जिल्हा उपनिबंधक कुंदन भोळे, कृषि विभागांचें उपसंचालक रवीन्द्र माने आदी उपस्थित होते.
रब्बी हंगामात पीक कर्जाचे वितरण जिल्ह्यात खूप कमी प्रमाणात झाले आहे. या प्रमाणात वाढ होण्याची आवश्यकता आहे. उदिष्ट आणि प्रत्यक्ष झालेले वाटप यांच्यात खूप अंतर आहे, असे जिल्हा अग्रणी बॅक व्यवस्थापक संतोष सोनवणे यांनी बैठकीच्या सुरवातीस सांगितलं.
यावर पीक कर्ज वितरण करण्यात यावे अशा शासनाच्या सूचना आहेत. रबी हंगामात उदीष्ट्य आणि पीक कर्ज वाटप यांच्यातील अंतर चिंताजनक आहे. त्यामुळे कर्ज वाटपासाठी मेळावे आयोजित करा. शेतकऱ्यापर्यत पोहोचा, कागदपत्रांसाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन् करा. जिल्ह्यातील प्रधानमंत्री किसान लाभार्थी शेतकऱ्यांना किसान क्रेडीट कार्ड सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठीही मोहीम हाती घ्या, असे शंभरकर यांनी सांगितले.
जिल्ह्यातील कारखाने उशीरा सुरु झाले आहेत. तसेच थकित कर्जामुळे नव्याने कर्ज घेण्यास तांत्रिकदृष्या अपात्र ठरत आहेत. त्याचबरोबर मागील वर्षी बहुतांश ऊस चारा छावणीसाठी वापरात आणला गेला. त्यामुळे शेतकऱ्यांना पैसे मिळाले आहेत. त्यामुळे कर्ज मागणी खालावली आहे. यापुढे शेतकऱ्यांनी मागणी करताच कर्ज पुरवठा करण्यात येईल, असे काही बॅक प्रतिनिधी यांनी बैठकीत सांगितले.
पंजाबराव देशमुख व्याज सवलत परतावा प्रस्ताव सादर करावेत. त्याबाबत जिल्हा उपनिबंधक कार्यालयाशी संपर्क साधावा, असेही शंभरकर यांनी सांगितले. महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील उर्वरीत लाभार्थी शेतकऱ्यांची माहिती पोर्टलवर पंधरा फेब्रुवारी पुर्वी करावी अशा सूचनाही शंभरकर यांनी दिल्या. ज्या शेतकऱ्यांनी आधार क्रमांक बॅक खाते क्रमांकाशी संलग्न केलेला नाही त्यांनी त्वरीत संलग्न करुन घ्यावे, असेही शंभरकर यांनी सांगितले.
बैठकीस तहसीलदार श्रीकांत पाटील, बँक ऑफ इंडियाचे अधिकारी अमोल सांगळे, विदर्भ कोकण ग्रामीण बँकेचे जिल्हा व्यवस्थापक वडापूरकर, बँक ऑफ महाराष्ट्राचे समन्वयक श्रीशैल मेहेरकर, भारतीय स्टेट बँकेचे चंद्रशेखर दिघे, ॲक्सिस बँकेचे सचिन काळोखे आदी उपस्थित होते.