सांगली (सुधीर गोखले)– भूसंपादन अभावी रखडलेल्या शहरातील मुख्य रस्ता असलेल्या आणि महामार्गाचा काही भाग असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज रस्त्याचे काम संथगतीने होत आहे ही वस्तुस्थिती आहे. नुकसान भरपाई बाबत तोडगा काढण्यासाठी केंद्रीय रस्ते मंत्री ना. नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांनी मिरज सुधार समिती शिष्टमंडळाला दिली. छत्रपती शिवाजी महाराज रस्त्याबाबत मिरज सुधार समितीने पालकमंत्री खाडे यांची भेटीची वेळ मागितली होती. त्यानुसार आज पालकमंत्री ना डॉ सुरेश खाडे यांची मिरज सुधार समितीचे ऍड. ए. ए. काझी, अध्यक्ष असिफ निपाणीकर, कार्यवाह जहीर मुजावर, उपाध्यक्ष राकेश तामगावे, अक्षय वाघमारे, गीतांजली पाटील, राजेंद्र झेंडे, युवा अध्यक्ष सुबहान सौदागर, जावेद शरिकमसलत, अफजल बुजरूक, वसीम सय्यद, सलीम खतीब आदी सदस्यांसमवेत बैठक झाली बैठकीत, 22 मीटर रस्ता रुंदीकरणात महात्मा फुले चौक ते बालाजी मंगल कार्यालयापर्यंत 34 मिळकत बाधित होणार आहे.
सुमारे 10 कोटी 65 लाखांचे नुकसान भरपाई देण्याबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणबरोबरच आता महापालिकेने असमर्थता दर्शविल्याने हा रस्ता पूर्ण क्षमतेने अंदाजपत्रकाप्रमाणे 22 मीटर होणे शक्य नसल्याचे ऍड. ए. ए. काझी यांनी ना. खाडे यांच्या निदर्शनास आणून दिले. नुकसान भरपाईबाबत पालकमंत्री खाडे यांनी तोडगा काढण्याची विनंती केली. पालकमंत्री खाडे यांनी हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणकडे असल्याने जिल्हा नियोजन समिती निधीतून भरपाई देण्यास तांत्रिक अडचणी असल्याचे स्पष्ट केले. म्हणून हा निधी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून मिळविण्यासाठी आपण केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा करण्याची ग्वाही पालकमंत्री खाडे यांनी मिरज सुधार समितीच्या शिष्टमंडळाला दिली.