सोलापूर :शास्त्रीय संगीताची ओळख व्हावी आणि ते ऐकायचं कसं हे समजावं या उद्देशाने ‘प्रिसिजन फाउंडेशन’ने रविवारी अँफी थिएटर येथे ‘ट्यून इन’ हा कार्यक्रम आयोजित केला होता. या माध्यमातून रसिक सोलापूरकरांनी शास्त्रीय संगीताचे धडे गिरवले. पुणे येथील बैठक फाऊंडेशनचे मंदार कारंजकर व दाक्षायणी आठल्ये यांनी शास्त्रीय संगीताचे पैलू सोलापूरकरांना उलगडून दाखवले. त्यांना तबल्यावर ओंकार सूर्यवंशी यांनी साथसंगत केली.
कोणतीही कला समजण्यासाठी सातत्याने तिचा ध्यास आणि अभ्यास लागतो; मात्र शास्त्रीय संगीताच्या बाबतीत असलेला मोठा गैरसमज म्हणजे ते समजायला कठीण आणि अनाकलनीय आहे. शास्त्रीय गायन वादनाच्या मैफिलीतून आपण साधारण काय अपेक्षा ठेवाव्यात, कलाकार काय सादर करायचा प्रयत्न करत असतात, शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमाची सांगितिक रचना कशी असते, वाद्य लावणे म्हणजे काय ह्या विषयांचा विचार ‘ट्यून इन’ ह्या कार्यक्रमात झाला.
सभागृहात उपस्थित श्रोत्यांनी प्रत्यक्ष गायनाचा आनंद घेतला. शास्त्रीय संगीताच्या मैफिलींच्या अनेक ध्वनीचित्रफिती पाहिल्या. तानपुरा, सतार, वीणा व इतर वाद्यांमधले फरक आणि गाण्याचा मानवी मनावर होणारा परिणाम अशा अनेक विषयांवर चर्चा झाली.
सोलापूरकरांना शास्त्रीय संगीताच्या महासागराच्या लाटांचा अनुभव घेता आला. कलाकार त्याची कला सादर करताना त्या कलेची उंची जेंव्हा गाठतो तेंव्हा श्रोत्यांनी कलाकाराबरोबर कसा प्रवास करावा? आणि गाण्याचा अभ्यास केल्याने अजून काय – काय फायदे होऊ शकतात याबद्दलही सोलापूरकरांना माहिती मिळाली. रविवारी सकाळी रंगलेल्या या सुरेल मैफिलीचे काही क्षण…