सोलापूर – प्रिसिजन कंपनीच्या सीएसआर फंडातून शालेय विद्यार्थ्यांसाठी नाविन्यपूर्ण दप्तर वितरित करण्यात आले. आयआयटी कानपूर येथील विद्यार्थ्यांनी संशोधन करून या डेस्कीटची निर्मिती केली आहे. बसुन अभ्यास करण्यासाठी उपयुक्त असे हे किट आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांना घरी अभ्यास करण्यासाठी टेबल खुर्ची उपलब्ध होत नाही ती अडचण या डेस्कीटच्या माध्यमातून दूर होईल. विद्यार्थ्यांना अभ्यास करताना आनंद होईल व त्यातून अभ्यासातील प्रगती चांगली होईल अशी रचना या डेस्कीटची आहे. या कार्यक्रमात जिल्हा परिषद शाळा अंबिका नगर, शिवाजी नगर, केगाव, खेड व गणेश नगर या शाळेतील विद्यार्थ्यांना डेस्कीट वितरित करण्यात आले.
विद्यार्थ्यानी त्यांना देण्यात आलेल्या डेस्कीटचा वापर करून भरपूर अभ्यास करून पुढे जावे असे आवाहन प्रिसीजन चे जनसंपर्क अधिकारी श्री माधव देशपांडे यांनी केले. प्रिसीजनच्या वतीने जिल्हा परिषद शाळा अंबिका नगर तालुका उत्तर सोलापूर येथे आयोजित करण्यात आलेल्या “अभिनव शालेय दप्तर” अर्थात डेस्कीट वितरण प्रसंगी ते बोलत होते. यावेळी सर फाऊंडेशन महिला राज्य समन्वयक सौ हेमा शिंदे – वाघ, जि प अंबिका नगरचे मुख्याध्यापक सिद्धाराम माशाळे,जि प शाळा केगावच्या विद्या वरडुळे, जि प शाळा गणेश नगरचे संजय ढेपे व जि प शाळा खेडचे लहु काळे सर आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रारंभी सावित्री बाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. सर्व मान्यवर पाहुण्यांचे स्वागत शिक्षकांनी केले. यावेळी वैशाली बनसोडे यांनी डेस्कीट वापराचे प्रात्यक्षिक दाखविले. हेमा शिंदे, विद्या वरडूळे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सिद्धाराम माशाळे यांनी तर सूत्रसंचालन शिवशंकर राठोड यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्रीमती तेजश्री ढगारे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षक श्रीमती रंजना काटकर, वैशाली गोंदकर, तेजश्री ढगारे,रसिका बंदीछोडे, शिवाजी वडते, शिवशंकर राठोड व चौधरी सर यांनी परिश्रम घेतले.