सोलापूर : मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक नरेश ललवाणी यांनी दौंड स्थानकाची पाहणी केली. त्यांनी सिग्नलिंग, सेफ्टी ट्रेन ऑपरेशन, ट्रॅक सेफ्टी पॅरामीटर्स आणि ओव्हर हेड इक्विपमेंट (OHE) च्या विविध आस्थापनांची पाहणी केली. दौंडला पोहोचल्यावर त्यांनी रेल्वे सुरक्षा तपासणीसाठी स्टेशन मॅनेजर, पॉइंट्स मॅन यांच्या कार्यालयाला भेट दिली आणि कर्मचाऱ्यांना सुरक्षिततेबाबत सल्ला दिला.
याशिवाय त्यांनी दौंड येथील अपघात निवारण गाडीची (एआरटी) पाहणी करून अपघातावेळी सज्जतेबाबत एआरटीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांशी संवाद साधला व कर्मचाऱ्यांना सुरक्षिततेने काम करण्याबाबत मार्गदर्शन केले. सिग्नलिंग सिस्टीमसाठी रूट रिले इंटरलॉकिंग केबिनच्या कामाचीही त्यांनी पाहणी केली. ट्रॅकचे मापदंड तपासण्यासोबतच त्यांनी स्थानकाच्या स्वच्छतेचीही पाहणी केली. या पाहणीदरम्यान सोलापूर विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक श्री नीरज डोहरे यांच्यासह सोलापूर विभागाचे विविध शाखा अधिकारी उपस्थित होते.