नवी दिल्ली : संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात होत आहे. यानिमित्तान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आर्थिक विषयांवरील चर्चा केंद्रस्थानी राहावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. तसंच आर्थिक स्थिती मजबूत करण्याचा प्रयत्न असल्याचंही ते म्हणाले आहेत. अधिवेशन सुरु होण्याआधी नरेंद्र मोदी यांनी पत्रकारांशी संवाद साधला. अर्थव्यवस्थेवरुन केंद्र सरकारवर विरोधकांच्या निशाण्यावर असताना उद्या अर्थमंत्री निर्मला सीतारमन अर्थसंकल्प मांडणार आहेत.
“या सत्रात देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी काम करु. या दशकाचा भक्कम पाया रचण्याचं काम आम्ही करु. या सत्रात आर्थिक विषयांवर चर्चा करण्यावर प्रामुख्याने लक्ष असेल. तसंच आर्थिक विषयांवरील चर्चा केंद्रस्थानी राहावी,” अशी अपेक्षा नरेंद्र मोदींनी व्यक्त केली. तसंच आर्थिक स्थिती मजबूत करण्याचा प्रयत्न असेल असंही म्हणाले. दोन्ही सभागृहात व्यापक चर्चा व्हावी. तसंच दिवसेंदिवस आपल्या चर्चेचा स्तर अजून उंचावत जावं अशी अपेक्षा असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.